नेतृत्व काँग्रेस पक्षाचे आणि वाटचाल समाजवादी विचारसरणीची. अशा भिन्न विचारसरणीचा मिलाफ डॉ. सा. रे. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळतो. वयाची नव्वदी पार करूनही काँग्रेसचा हा शेलार मामा पक्षाची खिंड लढवत राहिला. समाजवाद्यांचा कोसळणारा डोलारा सांभाळण्यासाठी त्यांचा हातभार मिळत गेला. सा. रे. पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची हानी आणि समाजवादी चळवळीला धक्का बसला.
शिरोळ तालुक्यातील जांभळी या आडवळणी गावातला सा. रे. पाटील यांचा जन्म. शेती करता करताच ते sam02सामाजिक चळवळीत ओढले गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरल्यावर या पक्षाच्या प्रमुखांच्या सान्निध्यात ते आले. त्यांच्या विचार व वर्तणुकीचा पाटील यांच्यावर कायमचाच प्रभाव पडला. त्यातून साधी राहणी उच्च विचारसरणीचा अवलंब त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंडय़ाखाली त्यांनी १९५७ साली विधानसभा निवडणुकीत पहिला विजय मिळविला. तो रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यासारख्या मातब्बरास पराभूत करून. पुढे पाटील हे काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत झाले तरी समाजवादी विचारांचा प्रभाव कायम राहिला.
शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम करण्यात सा. रे. पाटील यांची कामगिरी विलक्षण ठरली. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी कारखाना विशिष्टरीत्या चालविला. देशविदेशात भ्रमंती करून साखर कारखानदारीतील प्रगत तंत्रज्ञान दत्तवर आणण्यासाठी त्यांची जागरूक नजर सतत भिरभिरत राहिली. mh03कारखान्याची नवी प्रशासकीय इमारत, डिस्टिलरी, कागद कारखाना यामुळे शेतकऱ्यांची बिले थकली होती. पण वसंतदादा पाटील यांनी वैयक्तिक हमी देऊन कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळवून दिल्यावर सा. रे. पाटील यांनी पुन्हा कारखान्यावर आणि आपल्या निष्कलंक व्यक्तिमत्त्वावर बालंट येणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घेतली.
शेतकऱ्यांना चांगला दर देण्याबरोबर कामगारांसाठी घरकुले, पगारवाढ याकडे बारकाईने लक्ष दिले. कारखान्याचे सभासद, कर्मचारी यांच्या मुलांना देणगीशिवाय प्रवेश मिळवून देणारे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करून त्यांनी शिक्षणाचा बाजार सुरू करणाऱ्यांना चपराक दिली. कारखाना, बँक, शिक्षण संस्था, स्थानिक पुरवठा संस्था, दत्त बाजार, अभियांत्रिकी कॉलेज, इस्पितळ अशा माध्यमातून त्यांनी समाजहितासाठी केलेले कार्य वाखाणले गेले.