अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांचा सहभाग
मुंबई ग्राहक पंचायतीच्या ‘रिलायन्सला करा टाटा’ या मोहिमेची दखल ‘कन्झ्युमर्स इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय ग्राहक महासंघटनेने घेतली आहे. ब्राझील येथे होणाऱ्या जागतिक ग्राहक परिषदेत या मोहिमेचे जनक आणि पंचायतीचे कार्याध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. १८ नोव्हेंबरपासून ही परिषद सुरू होणार असून परिषदेत २० नोव्हेंबर रोजी अ‍ॅड. देशपांडे ‘रिलायन्सला करा टाटा’ मोहिमेचे सादरीकरण करणार आहेत.
‘कन्झ्युमर्स इंटरनॅशनल’ ही १२० देशांतील अडीचशे ग्राहक संघटनांची महासंघटना आहे. ग्राहक हितासाठी राबविण्यात आलेल्या अभिनव आणि कल्पक मोहिमांबाबत संघटनेने प्रवेशिका मागविल्या होत्या. यातून तीन सर्वोत्तम मोहिमांची निवड करण्यात आली असून यात ‘मुंबई ग्राहक पंचायती’च्या ‘रिलायन्सला करा टाटा’ या मोहिमेची निवड झाली आहे.
रिलायन्सच्या वीज दरात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली होती. त्या वेळी मुंबई ग्राहक पंचायतीने कायद्यातील तरतुदींचा, तसेच टाटा पॉवरच्या वीज परवान्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत रिलायन्सच्या उपनगरातील मक्तेदारीला आव्हान दिले.
टाटा पॉवरच्या स्वस्त विजेचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतो हे राज्य वीज नियामक आयोगाला पटवून दिले.
टाटा पॉवर, रिलायन्स आणि वीज नियामक आयोगाबरोबर चर्चा करून रिलायन्सच्या ग्राहकांना टाटा पॉवरकडे स्थलांतरित होण्याची कार्यपद्धती नियामक आयोगाकडून करवून घेतली. त्यानंतर ‘रिलायन्सला करा टाटा ही मोहीम प्रभावीपणे राबविली त्याला हजारो ग्राहकांनी प्रतिसाद दिला. ब्राझील येथे होणाऱ्या या परिषदेस मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणी सदस्य शुभदा चौकर उपस्थित राहणार आहेत.