अफझलखानी फौज, दिल्ली की बिल्ली अशी टीका करीत भाजपला हिणवणाऱया शिवसेनेला मोठा धडा शिकवण्याचे भाजपने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. एका केंद्रीय मंत्र्यानेच ही माहिती दिली आहे. आता शिवसेना मोदी आणि शहा यांची माफी मागणार की अस्मितेचा प्रश्न करणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
स्वबळावर राज्यात सत्ता स्थापण्याची स्वप्ने पाहणाऱया शिवसेनेला साधा शंभरीचा आकडाही पार करता आला नाही. त्याचवेळी भाजपने १२२ पर्यंत मजल मारत सत्तास्थापनेचा दावाही केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असल्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. सत्तास्थापनेचा दावा करणाऱया भाजपने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेचा उल्लेखही केलेला नाही. येत्या शुक्रवारी होणाऱय़ा मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी केवळ भाजपचेच मंत्री शपथ घेणार असून, शिवसेनेला तूर्ततरी लांबच ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्व शक्यतांचा वापर करण्यात येत असल्याचे दिसते. त्यातच आता माफी मागा असा सूर भाजपने लावल्यामुळे शिवसेना पुरती अडचणीत सापडली आहे.
भाजपने मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड केली. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले असून, १५ दिवसांत विधानसभेत बहूमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे. मात्र, या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपने शिवसेनेला कोठेही सहभागी करून घेतले नाही. भाजपजेच राष्ट्रीय सरचिटणीस जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, शुक्रवारी होणाऱया शपथविधीवेळी केवळ भाजपचेचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.