बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात झालेल्या बदलामुळे चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा १७ मार्चऐवजी २४ मार्चला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीची जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा १७ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पण, याच दिवशी चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार होती. राज्यभरातून शिष्यवृत्ती परीक्षेला तब्बल १७ लाख विद्यार्थी बसणार आहेत. तर जीवशास्त्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे सुमारे तीन लाख. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ज्या परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी शिष्यवृत्ती आणि बारावी अशा दोन्ही परीक्षा होणार आहेत तिथे मोठा गोंधळ उद्भवण्याची शक्यता होती. म्हणून शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला होता. त्यानुसार शिष्यवृत्तीची परीक्षा १७ ऐवजी २४ मार्चला होणार आहे.