पाच विद्यार्थी किरकोळ जखमी
ठाणे येथील नितीन कंपनी उड्डाण पुलाजवळ बुधवारी दुपारी शाळेच्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघालेली बस उलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात बसचा क्लिनर आणि पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
ठाणे येथील ब्रह्मांड परिसरातील युनिव्हर्सल या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघालेली बस नितीन कंपनी उड्डाण पुलाजवळ उलटी झाली. एका डम्परने ओव्हरटेक केल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाला. या अपघातात बसमधील विद्यार्थी अनिश वैद्य, दर्शना सोनावणे, श्रुती धांडे, प्रियंका महेश्वरी, रिया सचदेव आणि क्लिनर दीपक जैस्वाल हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन या सर्वाना बसच्या बाहेर सुखरूप काढले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बसचा चालक विजय गुप्ता याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात येते का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.