भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने मोटारसायकलीला दिलेल्या धडकेत एका आठ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. शिवाजी नगरच्या मानखुर्द घाटकोपर लिंक रोड येथे गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.
 झोया शेख (८) ही विद्यार्थिनी देवनारच्या टीचर्स कॉलनीत राहत होती. ती पालिकेच्या अंजुमन रियाझुल उर्दू शाळेत तिसरीत शिकत होती. तिचे वडील वाशिक शेख हे एका खासगी औषध कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी सात वाजता ते नेहमीप्रमाणे झोयाला आपल्या मोटारसायकलीवरून शाळेत सोडण्यासाठी जात होते. शिवाजी नगरच्या बैंगणवाडी जंक्शन येथील मानखुर्द घाटकोपर लिंकरोडवर वाशीच्या दिशेने जाणाऱ्या एका डंपरने त्यांच्या मोटारसायकलीला धडक दिली. या अपघातात मागे बसलेली झोया ट्रकच्या मागील चाकाखाली आली. जखमी झालेल्या झोया आणि तिचे वडील वाशिक यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान झोयाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या वाशिक यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून फरार झालेल्या डंपरचालक एकनाथ कांबळे (३५) याला देवनार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी अटक केली.