शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका लहानग्याला जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी कल्याणमध्ये घडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेवरच हल्ला करत कार्यालयाची मोडतोड केली. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कल्याणनजीक शहाड येथे सेंच्युरी रेयॉन ही शाळा आहे. शाळा परिसरात सेंच्युरी रेयॉन संलग्नित सीनेरे स्कॉलर अकादमीतील केजीच्या वर्गात अर्जुन धिन्ना हा पाच वर्षांचा मुलगा शिकतो. मंगळवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत आला. मात्र, आईने दिलेला उपमा खाल्ल्यानंतर त्याला शाळेत उलटी झाली. अर्जुनला तातडीने दवाखान्यात नेणे किंवा पालकांना बोलावणे आवश्यक होते. परंतु शाळेतील शिक्षकांनी यापैकी काहीही न करता अर्जुनला दीड तास शाळेत झोपवून ठेवले. त्याची आई त्याला न्यायला आली असता तो बाहेर झोपलेला आढळला. अर्जुनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शाळेच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप अर्जुनच्या आईने केला. या घटनेनंतर संतप्त पालकांनी संस्थेच्या विश्वस्तांना जाब विचारून त्यांच्या कार्यालयाची मोडतोड केली.