शाळेत जायचे म्हटले की, जड दप्तर खांद्याला लावायचे आणि निघायचे, असा विद्यार्थ्यांचा दिनक्रम; पण शुक्रवारी मात्र दक्षिण मुंबईतील तब्बल ४७१ शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी दप्तराविना शाळेत प्रवेश केला. निमित्त होते ते शिक्षण निरीक्षकांनी राबविलेल्या उपक्रमाचे.
विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये लोप पावत असलेली वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी दक्षिण मुंबई शिक्षण निरीक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाला शुक्रवारी भरघोस प्रतिसाद मिळाला. मुंबईतील दादर येथील बालमोहन विद्यामंदिर, शारदाश्रम विद्यामंदिर, परळ येथील सोशल सíव्हस लीग अशा दक्षिण मुंबईतील ४७१ शाळांनी यात भाग घेत ‘वाचू आनंदे’ या उपक्रमात भाग घेत विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार केले. विद्यार्थी वाचनसंस्कृतीपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही वाचनसंस्कृतीकडे वळविण्यासाठी दक्षिण मुंबईच्या शिक्षण संचालक बी.बी. चव्हाण यांनी ‘वाचू आनंदे’ या उपक्रमांची घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी दक्षिण मुंबईत दप्तरविना शाळा भरली होती. या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रांतील नामांकित मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
बालसाहित्यक अनंत भावे यांनी राजा शिवाजी विद्यालयात, तर पत्रकार रवींद्र आंबेकर यांनी शारदाश्रम विद्यामंदिर, तर माहिमच्या सरस्वती विद्यालयात नयना आपटे, सेवा सदन गर्ल्स हायस्कूल येथे विजयराज बोधनकर यांनी उपस्थिती दर्शवीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बोधनकर यांनी ‘श्यामची आई’ या साने गुरुजींच्या पुस्तकाची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली, तर दक्षिण मुंबईचे शिक्षण निरीक्षक बी. बी. चव्हाण यांनीदेखील अनेक शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही विविध उपक्रमांत सहभाग घेतला होता तसेच वाचनाबद्दलचे महत्त्व पटवून देणारे फलक लावून, तर कोणी विविध प्रकारची चित्रे रंगवीत आजचा दिवस साजरा केला.