देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जन्मदिवस ‘शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र त्यांचे छायाचित्र मिळवण्यासाठी शाळांना वणवण करावी लागली. शिक्षण दिनाच्या दिवशी शाळांमध्ये त्यांचे छायाचित्र लावावे या उद्देशाने काही शाळांनी सरकारी मुद्रणालयाकडे संपर्क साधला. मात्र असे छायाचित्र तयार करण्याबाबत आम्हाला कोणताही आदेश नसल्याचे सांगत तेथून शाळेतील कर्मचाऱ्यांची बोळवण करण्यात आली. यामुळे हे छायाचित्र नेमके कुठे मिळेल, याबाबत शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही शाळांनी इंटरनेटवरून छायाचित्र घेऊन त्याला फ्रेम करून ते वापरले. सामान्यत: राष्ट्रीय व्यक्तींची छायाचित्रे सरकारी मुद्रणालयात राजशिष्टाचारानुसार उपलब्ध करून दिली जातात. याचप्रमाणे यांचेही छायाचित्र मिळेल या आशेने अनेक शाळांनी तेथे धाव घेतली. मात्र तेथे छायाचित्र न मिळाल्याने छायाचित्र मिळवण्यासाठी शालेय कर्मचाऱ्यांना वणवण करावी लागल्याचे मुख्याध्यापक महासंघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले. आपल्या देशाला योगदान दिलेल्या काही व्यक्तींची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने विशिष्ट दिनांचे आयोजन केले जाते. या दिवशी केवळ तोंडी माहिती सांगून पुरेसे नसते. जर त्या व्यक्तीचे छायाचित्र समोर ठेवले तर विद्यार्थ्यांना तिचा चेहरा लक्षात राहतो व पुढे ते जेव्हा कधी त्या व्यक्तीचे छायाचित्र पाहतील तेव्हा त्यांना त्यांची आठवण होईल, यामुळे अशा कार्यक्रमांना छायाचित्र महत्त्वाचे असते, असेही रेडीज म्हणाले. या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती मागविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  
राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुलाबा येथील महापालिका शाळेला भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणार असून राज्यातील सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवू, असा विश्वास व्यक्त केला. आयआयटीमध्येही शिक्षण दिन साजरा करण्यात आला.