मुंबईतील महापालिका आणि अनुदानित अशा सुमारे ५३० शाळांमध्ये जैविक व अन्य शौचालये बांधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी गेले काही महिने त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.
मुंबईतील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शौचालयांची दुरवस्था आणि स्वच्छतेबाबत महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देऊन खास निधीची मागणी केली होती. जैविक स्वच्छतागृहांमुळे पाण्याचा गैरवापर होत नाही, देखभाल खर्च कमी येतो आणि अन्य फायदे होतात. त्यामुळे जैविक स्वच्छतागृहे उभारण्याची सूचना महाजन यांनी केली. म्हाडाकडे सुमारे ३६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून तो देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर हा निधी मंजूर करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.