आर्थिक स्थिती नाजूक बनलेल्या बेस्ट उपक्रमाला भंगाराचा आधार मिळाला असून गेल्या तीन वर्षांमध्ये भंगारात काढण्यात आलेल्या ४९८ बसगाडय़ांच्या विक्रीतून तब्बल १२ कोटी ९९ लाख रुपये बेस्टच्या तिजोरीत जमा झाले आहेत. या भंगारामुळे ‘बुडत्याला काडीचा आधार’ अशी अवस्था बेस्टची झाली आहे.
बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोटय़ात सुरू असून हा तोटा भरून काढण्यासाठी विद्युतपुरवठा विभागाच्या नफ्याचा वापर केला जात आहे. परिणामी उपक्रमापुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यासाठी बेस्टकडे पैसे नव्हते. पैशांची जुळवाजुळव केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले. त्यातच दिवाळीनिमित्त बोनसच्या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक झाल्यामुळे बेस्ट प्रशासनाची कोंडी झाली होती. मात्र महापौर सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीनंतर बेस्ट प्रशासनाने बोनस देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे कामगार संघटनांनी आंदोलनापासून माघार घेतली. मात्र बोनस कधी मिळणार हे निश्चित नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतनावरच आपली दिवाळी साजरी करावी लागणार आहे.
पंधरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे बेस्टने गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्या ताफ्यातील सुमारे ४९८ बसगाडय़ा भंगारात काढल्या असून त्याच्या विक्रीतून बेस्टच्या तिजोरीत १२ कोटी ९९ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे बेस्टला थोडासा दिलासा मिळाला आहे.      

वर्ष        बसगाडय़ा      मिळालेली रक्कम
२०१०          २५४         ६ कोटी २६ लाख रुपये
२०११             ८१         २ कोटी १४ लाख रुपये
२०१२          १६३         ४ कोटी ५९ लाख रुपये

scrap,best bus