मनस्विनी लता रवींद्र, पटकथा-संवाद लेखिका

लहान असतानाच आई-बाबा यांनी माझी शब्दांशी ओळख करून दिली. वाचनाची गोडी लागल्याने माझा ओढा मैदानी किंवा अन्य खेळांपेक्षा पुस्तकांकडे जास्त होता. ‘फास्टर फेणे’, ‘गोटय़ा’, ‘श्यामची आई’ आदी पुस्तके वाचली. पण लहानपणी मराठीत अनुवादित झालेली रशियन बालसाहित्याची पुस्तके जास्त वाचली. यात ‘डेनीसच्या गोष्टी’, ‘सुंदर वासीलिसा’, ‘एका अस्वस्थ माणसाची गोष्ट’, मॅक्झीन गॉर्की यांचे ‘माझी आई’, युद्धविषयक आणि इतर पुस्तकांचा समावेश होता. हे वाचन आठवी ते दहावीपर्यंत सुरू होते. अनुवादित पुस्तके वाचण्याकडे जास्त कल होता.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

अकरावी-बारावीत असताना चिं. त्र्यं. खानोलकर, गो. नी. दांडेकर यांचे साहित्यही वाचले. ‘चिं. त्र्यं’ त्या वयात किती कळले सांगता येणार नाही, पण मिळेल तसे वाचत गेले. १२वी नंतर ललित कला केंद्र (पुणे विद्यापीठ) येथे प्रवेश घेतला. त्यावेळी विविध नाटकांच्या आणि नाटकाशी आनुषंगिक इतर पुस्तकांचे वाचन झाले. या वाचनामुळे मला स्वत:कडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. अमूकच एखादे पुस्तक वाचायचे किंवा सलग एकाच लेखकाची पुस्तकेवाचायची असे ठरवून वाचन करत नाही. मनाला जे चांगले वाटेल, भावेल ते वाचत जाते. त्यामुळे कधी कधी दोन/तीन पुस्तकेही एकाच वेळी माझ्या वाचनात असतात.  सध्या ज्या व्यवसायात आहे तिथे माझ्या वाचनाच्या सवयीचा खूप चांगला फायदा झाला आणि होत आहे. वाचनामुळे आपला स्वत:चा परीघ विस्तारतो. नाटक, चित्रपट, मालिका आदी वेगवेगळ्या माध्यमांसाठी पटकथा, संवाद लिहिताना या सगळ्या वाचनाचा उपयोग होतो. या तीनही माध्यमातील लेखनाची पद्धत वेगवेगळी आहे. त्या त्या माध्यमांसाठी विशिष्ट शैलीत कसे लिहायला पाहिजे त्यासाठी तसेच कथा, पटकथा यातील वेगळेपणा टिपण्यासाठी आजवर केलेल्या वाचनाचा मला फायदाच झाला.

कमल देसाई यांचे ‘हॅट घालणारी बाई’, ‘काळा सूर्य’ किंवा भाऊ पाध्ये यांची ‘वासूनाका’, ‘राडा’ व अन्य, चिं.त्र्यं. खानोलकर यांचे ‘रात्र काळी घागर काळी’ आदी पुस्तके वाचून आतून कुठेतरी हलली गेले. मानवी स्वभाव आणि भाव-भावनांचे चित्रण त्यात प्रभावीपणे आले आहे. हे सर्व विविध पदर लेखनातून मांडणे कठीण आहे. ती लेखनशैलीही मला वेगळी वाटली. इंग्लंडच्या लेखिका साराकेन यांचीही नाटके वाचली. त्यांनी त्यांच्या नाटकांमधून समाजाचे व त्यातील बऱ्या-वाईट गोष्टींचे विच्छेदन केले आहे. जॉ जेने तसेच आपल्याकडील विजय तेंडुलकर, सतीश आळेकर हे लेखकही आवडीचे असून त्यांचीही पुस्तके, नाटके वाचली आहेत. नव्या पिढीतील शिल्पा कांबळे, अवधूत डोंगरे यांचे लेखन आवडते. सध्या बनाना योशीमोटो या लेखिकेची ‘किचन’ ही अनुवादित कादंबरी तसेच अन्य काही इंग्रजी पुस्तकांचे वाचन सुरू आहे.

माझ्या व्यवसायात आणि या क्षेत्रात आजूबाजूला बरेच जण वाचणारे आणि लिहिणारेही आहेत. प्रत्येक पिढीतच वाचनाच्या बाबतीत कमी-अधिक घडत असते. त्यामुळे आताच्या पिढीला दोष देऊन चालणार नाही. वेगवेगळ्या स्तरावर या पिढीचे वाचन सुरू आहे. तसेच वेगवेगळ्या ‘सामाजिक माध्यमां’ंमधून ही तरुण पिढी व्यक्त होत आहे. ई-बुक, इंटरनेट, ब्लॉग तसेच अन्य माध्यमातूनही तरुण पिढीकडून लिहिले जात आहे. यात कविता, कथा, कादंबरी यासह सामाजिक व राजकीय आणि सद्य:स्थितीतील विविध विषयांवर तरुण पिढीकडून लिहिले जात आहे.

वाचन ही एक निरंतर प्रक्रिया आहे. एखादे पुस्तक वाचून संपले असे होत नाही. आपल्या मनाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात ते घर करून राहते. त्यामुळे एकाने अमूक वाचले म्हणजे त्याच्यावर जो परिणाम/संस्कार होईल अगदी तसाच तो दुसऱ्यावर होईलच, असे सांगता येणार नाही. पण एक मात्र नक्की की वाचनाने प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही विचार सुरू होतात, मनात व डोक्यात काही वेगळ्या प्रतिमा तयार होण्यास मदत होऊ शकते. अर्थात हे सर्व वैयक्तिक असते. आजवरच्या वाचनाने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे मिळाली. या माणसांमुळे नवीन पुस्तकांची ओळख झाली. या सगळ्यांमुळे मी जशी आहे तशी घडत गेले.