मुंबई महापालिकेच्या अजब योजनेला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध
शहरातील मोकळे भूखंड ना विकास क्षेत्र बांधकामासाठी उपलब्ध करून देतानाच नवीन मोकळय़ा जागा निर्माण करण्यासाठी समुद्रात भराव टाकण्याची योजना मुंबई महापालिकेच्या सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपात मांडण्यात आली आहे. मोकळय़ा जागा बिल्डरांच्या घशात घालताना नवीन जागांसाठी समुद्रावर अतिक्रमण करण्याच्या या योजनेला पर्यावरणतज्ज्ञांनी जोरदार विरोध केला असून दक्षिण मुंबईतील श्रीमंतांसाठी हा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहराच्या विकासाची योजना आखणाऱ्या २०१४-३४ या २० वर्षांच्या आराखडय़ातील दोष सुधारून सुधारित आराखडा तयार केला जात आहे. या आराखडय़ातील विकास नियंत्रण नियमावलीची माहिती आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. दहा लाख परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ना विकास क्षेत्र तसेच मिठागरे येथील जागा बांधकामांसाठी खुली करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यामुळे अर्थातच शहरातील मोकळ्या जागा कमी होणार आहेत. या जागा भरून काढण्यासाठी भराव घालून नवीन जागा तयार करण्यात येतील. विकास आराखडय़ासाठी विशेष नेमणूक करण्यात आलेले आयएएस अधिकारी रमाकांत झा यांनी सादरीकरणादरम्यान कफ परेड येथील समुद्रात ३०० एकरवर हिरवळ निर्माण करण्याचा आराखडा दाखवला. या आराखडय़ानुसार कफ परेड येथील समुद्रात बाग, मोकळे मदान, मुलांसाठी खेळण्याची साधने असलेली ३०० एकर जागा तयार करण्यासाठी भराव टाकला जाणार आहे. या भरावाच्या आजूबाजूने मच्छीमारांच्या होडय़ांना ये-जा करण्यासाठी कालवा ठेवला जाईल. अशाच प्रकारचे भराव टाकून मुंबईत इतर ठिकाणीही मोकळ्या जागा निर्माण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. सामाजिक कार्यकत्रे व पर्यावरणप्रेमींनी याला जोरदार विरोध केला आहे.
स्वच्छ, शुद्ध हवा देणाऱ्या जागा हा सर्व मुंबईकरांचा हक्क आहे. मात्र दक्षिण मुंबईत आधीच मुबलक मोकळी जागा असताना समुद्रात भराव टाकून श्रीमंतांसाठी आणखी एक सोय उपलब्ध करून दिली जात आहे. उपनगरांमधील जागा विकासकांना आंदण देऊन दुसऱ्या टोकाला अशी जागा तयार करण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी सध्या उपलब्ध असलेल्या जागा टिकवा, असे वनशक्तीचे डी स्टॅलिन म्हणाले. आम्ही २०१४ मध्ये ही जागा मेट्रो कारशेडसाठी सुचविली होती. मात्र त्यावेळेस हे अव्यवहार्य असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता आरेमधील हिरवळ तोडून तेथे कारशेड उभारणार आणि कफ परेडच्या समुद्रात भराव टाकून झाडे लावण्याचा अजब प्रकार पालिका प्रशासन करणार आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईत मोकळय़ा जागा मुबलक आहेत आणि सुटीच्या दिवशी दोन तास प्रवास करून उपनगरातील रहिवासी कफ परेडमध्ये हवा खाण्यासाठी येणार नाहीत, विकासकामांमुळे नष्ट होत चाललेली उपनगरातील हिरवळ वाचविणे महत्त्वाचे आहे, असे पर्यावरणतज्ज्ञ ऋषी अग्रवाल यांनी सांगितले.

आरेतील मेट्रो आणि प्राणिसंग्रहालयालाही विरोध
आरेमधील संस्थांसाठी असलेले आरक्षण काढून टाकले असले तरी मेट्रो कारशेडचे आरक्षण व तब्बल २५० हेक्टरवरील प्राणिसंग्रहालय यालाही विरोध होत आहे. मेट्रो कारशेडसाठी मुंबईत इतरत्र कुठेच जागा शिल्लक नाही का.. प्राणिसंग्रहालयाच्या नावाखाली पंचतारांकित हॉटेल, जलतरण तलाव बांधण्याचा पालिकेचा मानस आहे. आधी प्राणिसंग्रहालयाचा आराखडा द्या आणि त्यानंतर मुंबईकरांची मते मागवा, असा सल्ला पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. .