वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरून(सी-लिंक) प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आता आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. या टोलच्या दरात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने(एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून सी-लिंकवर छोटय़ा गाडय़ांसाठी ६० रुपये, तर बेस्ट बसला १२५ रुपये टोल आकारला जाणार आहे.
 राज्यातील टोलमध्ये वर्षांला पाच टक्के वाढ करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र प्रतिवर्षांला वाढ करण्याऐवजी दर तीन वर्षांनी दरवाढ करण्याचे धोरण एमएसआरडीसीने घेतले असून त्यानुसार एप्रिल २०१२ नंतर आता तीन वर्षांनी सी-लिंकच्या टोलदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कारसारख्या चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी आता ५५ ऐवजी ६० रुपये आकारले जाणार आहेत. तर मिनी बससाठी ८० ऐवजी ९५ आणि ट्रक, बसगाडय़ांसाठी ११० ऐवजी १२५ रुपये एकेरी प्रवासासाठी घेतले जाणार असून दुहेरी प्रवासासाठी दीडपट तर डेली पाससाठी अडीच पट टोल आकारला जाणार आहे.