उलटय़ा आणि जुलाबांमुळे हैराण होणारे तुम्ही एकटेच नाही, डॉक्टरांकडे येणारा दर चौथा रुग्ण ही तक्रार घेऊन येत आहे. रोटाव्हायरस व अमिबा या दोन्हींमुळे मुंबईकरांना सध्या ताप, उलटय़ा व जुलाबांचा त्रास सुरू झाला आहे. पावसाअभावी दबा धरून बसलेले लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया तसेच डेंग्यू आजारही आता डोके वर काढू लागले आहेत.
गेला पंधरवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली असली तरी आजार पसरवणाऱ्या विषाणू व जिवाणूंचाही सुकाळ झाला आहे. जूनचा पहिला आठवडा वगळता फारसा पाऊस नसल्याने साथीचे आजारही आटोक्यात होते. विषाणूंमुळे येणारा ताप, उलटय़ा आणि जुलाबावरील उपचारांसाठी शहर-उपनगरात ठिकठिकाणी दवाखान्यात रांगा लागत आहेत. लहान मुलांनाही ताप, सर्दी, खोकल्याने हैराण केले आहे.
महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत गेल्यावर्षीच्या तुलनेत मलेरिया, डेंग्यू तसेच पोटविकारांचे प्रमाण ७० ते ८० टक्के होते. मात्र जुलैच्या अखेरच्या आठवडय़ात सुरू झालेल्या पावसानंतर हे प्रमाण वाढल्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेकडे ताजी माहिती अद्याप आलेली नाही.   काही वर्षांपूर्वी मलेरियाचा उद्रेक झाला होता. मात्र त्यानंतर पालिकेने दर रविवारी आरोग्यशिबीर सुरू केल्याने मलेरिया तसेच डेंग्यूचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात मलेरिया तसेच डेंग्यूचे रुग्ण दिसत असले तरी त्यांची संख्या कमी आहे, असे नायर महापालिका रुग्णालयाचे डॉ. राकेश भदाडे यांनी सांगितले. विषाणूसंसर्ग झालेल्यांनी खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरल्यास आजारांचा फैलाव कमी होऊ शकेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावर्षी जून-जुलैमध्ये ताप, पोटदुखीच्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. मात्र नुकत्याच झालेल्या पावसाने हे चित्र बदलले आहे. जवळपास दर चौथा रुग्ण जुलाब आणि उलटय़ांनी हैराण आहे. त्याचप्रमाणे मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण दिसू लागले आहेत
डॉ. अनिल पाचणेकर

उपाय
* पाणी गाळून व उकळून प्या. घरात किंवा सभोवताली पाणी साचू देऊ नका.
* रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका. शिळे व थंड पदार्थ टाळा.
* शिंकताना, खोकताना रुमाल तोंडासमोर घ्यावा. सकस आहार व पुरेशी झोप घ्या.