ताप, डेंग्यू, मलेरियाने रुग्ण त्रस्त
सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात तापलेली मुंबई आणि त्यानंतर आलेल्या पावसाच्या सरी या वातावरणामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या अकरा दिवसांत साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात ताप, डेंग्यू, मलेरिया तसेच पोटदुखीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या आधीच्या पंधरवडय़ापेक्षा अधिक आहे. त्यातच डेंग्यूची साथही कमी होत नसून या महिन्यात डेंग्यूचे १७०० संशयित रुग्ण आढळले आहेत.

पावसाळा सुरू होताना व संपताना तापमानात होत असलेले चढउतार विषाणूवाढीसाठी पोषक असतात. त्यामुळे या काळात तापाची साथ येते. या वेळी सप्टेंबर महिन्यातच पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने तापाची साथ लवकरच दाखल झाली. ऑक्टोबर महिन्यातही ही साथ सुरू आहे. ऑक्टोबरच्या अकरा तारखेपर्यंत तापाचे ३५०० हून अधिक रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात दाखल झाले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या तेरा हजारांहून अधिक होती.

डेंग्यूचे १७०० रुग्ण

डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही कमी होत नसून आतापर्यंत डेंग्यूचे १७०० संशयित रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरमधील डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या चार हजारावर पोहोचली होती. तापाच्या साथीसोबतच जुलाब, उलटी या पोटदुखीच्या आजारानेही मुंबईकर त्रासले आहेत. पालिकेच्या रुग्णालयात ३०७ रुग्णांची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात खासगी दवाखाने व रुग्णालयांमध्ये जात असलेल्या रुग्णांची संख्या काही पटींनी अधिक आहे.