निकालाची दुसरी मुदतही संपुष्टात

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिलेली दुसरी मुदत संपल्यानंतरही विद्यापीठातील मूल्यांकनाचे काम मंदगतीने सुरू आहे. रविवारी सुट्टी असल्याने फक्त १० हजार उत्तरपत्रिका तपासल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरही अद्याप दोन लाख उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक असल्याचे कळते.

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालासंदर्भात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याची सूचना दिली होती. मात्र त्यानंतरही निकाल जाहीर न करण्यात आल्याने विद्यापीठाला ही मुदत वाढवून ५ ऑगस्ट देण्यात आली होती. तरीही अद्याप असंख्य विद्यार्थ्यांचे निकाल बाकी असून, ही मुदत शनिवारी संपली. त्यामुळे आता विद्यापीठाकडूनच १५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यपालांकडून दोन वेळा देण्यात आलेली मुदत संपूनही उत्तरपत्रिकांच्या मूल्याकनांचा वेग वाढलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा विद्यपीठावर टीकेची झोड उठविली जात आहे. तसेच विद्यापीठाने स्वत:हून जाहीर केलेली मुदत तरी पाळणे शक्य होणार आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, शनिवापर्यंत दोन लाख ३२ हजार ३१२ उत्तरपत्रिका तपासणी बाकी असल्याची आकडेवारी समोर आली होती, तर रविवारी फक्त दहा हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असल्याने दोन लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीच असल्याचे परीक्षा विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येते.

  • एक हजार २८७ प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांची ऑनलाइन तपासणी शनिवारी केली. दिवसभरात संध्याकाळी सात वाजेपर्यंत १३ हजार २०३ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले, तर दहा हजार ४४२ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण करण्यात आले.
  • मॉडरेशनसाठी विद्यपीठाकडे आतापर्यंत सहा लाख ८३ हजार ९९८ उत्तरपत्रिका आलेल्या आहेत. त्यांपैकी ७९ हजार ८४५ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन होणे बाकी असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते.