गणेशोत्सव काळात गर्दीचा फायदा घेऊन महिलांची छेड काढण्याच्या प्रकारांना आता आळा बसणार आहे. महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत मुंबई पोलिसांनी खास व्यवस्था केली असून यंदा स्वतंत्र छेडछाड विरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी होणाऱ्या छेडछाडीचे चित्रीकरण करून आरोपींच्या पालकांना ते दाखविले जाणार आहे. विशेष म्हणजे बलात्काराचा आणि विनयभंगाचा आरोप असणाऱ्या सर्व आरोपींची यादी बनविण्यात आली असून गणेशोत्सव काळात या सर्व आरोपींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केली जाणार आहे.
गणेशोत्सव काळात महिलांचे विनयभंग, छेडछाड आदी प्रकार रोखण्यासाठी हे पथक काम करणार आहे. साध्या वेशातील हे पोलीस सर्वत्र गस्त घालणार आहेत. छेडछाड होत असल्यास त्याचे चित्रीकरण करून आरोपी मुलांच्या पालकांना ते दाखविले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. मंगळवारी अशा पद्धतीने चित्रीकरण करून २५ तरुणांना अटक करून नंतर त्यांच्या पालकांना बोलविण्यात आले होते. प्रमुख मंडळाबाहेर ‘मोबाइल पोलीस स्टेशन’ही उभारण्यात येणार आहे. त्यात सर्व सुविधा असून तक्रार असल्यास तात्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे. ज्यांच्यावर बलात्काराचे, विनयभंगाचे आरोप आहेत अशा आरोपींची यादी प्रत्येक पोलीस ठाण्यात बनविण्यात आली आहे. अशा आरोपींनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक करण्यात येईल असेही ते म्हणाले. प्रत्येक पोलीस ठाण्यात असे सरासरी दहा आरोपी आहेत. त्यांच्या गुन्ह्य़ाच्या तीव्रतेनुसार ही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धक्काबुक्की आणि छेडछाड होऊ नये, म्हणून स्त्री-पुरुष भाविकांच्या वेगळ्या रांगा लावण्याच्या सूचना प्रत्येक मंडळाला देण्यात आल्या आहेत. तसेच स्वयंसेवकांना महिला भाविकांशी नीट वागण्याची ताकीद देण्यात आली आहे.
साध्या वेशातील पोलीस सर्वत्र गस्त घालणार आहेत. छेडछाड होत असल्यास त्याचे चित्रीकरण करून आरोपी मुलांच्या पालकांना ते  दाखविले जाईल.
– राकेश मारिया, पोलीस आयुक्त