गुजरात येथील भरूचमधील एका कंपनीतून न्हावा-शेवा येथे निघालेल्या एका ट्रेलरमधील सुमारे एक कोटी रुपयांच्या तांब्याच्या प्लेटचा अपहार करणाऱ्या सुरक्षारक्षकास ठाणे ग्रामीण पोलिसांनी नुकतीच अटक केली असून, त्याच्याकडून तांब्याच्या प्लेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी ट्रेलरचालक आणि त्याचे तीन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सन्नीकुमार गुंजलाल डोगरा, असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव असून तो जम्मू-कश्मीरचा रहिवासी आहे. २३ डिसेंबर २०१३ रोजी गुजरात येथील भरूचमधील एका खासगी कंपनीतून चार ट्रेलर तांब्याच्या प्लेट घेऊन न्हावा-शेवा येथे जात होते. त्यांच्यासोबत कंपनीने सन्नीकुमार या सुरक्षारक्षकास पाठविले होते, मात्र यातील एका ट्रेलरमधील एक कोटी रुपयांच्या तांब्याच्या प्लेट न्हावा-शेवा येथील कंपनीत पोहोचविण्यात आल्या नव्हत्या. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने शोध घेऊन सन्नीकुमारला अटक केली.