शिवसेनेने ज्यांना मोठे केले त्यातले काही जण शिवसेनेच्या अंगावर आले आहेत. शिवसेनेचे ऋण विसरलेल्या गद्दारांना गाडा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोपरखरणे येथे केले.  यावेळी शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या सर्वाची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.
एकाला गाडून दुसऱ्याला गाडायला आलोय. शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना मोठे केले ते त्यांचे ऋण विसरून शिवसेनेच्याच अंगावर आले, त्यांना शिवसैनिकांनी गाडले आहे. आता राज्यात कोणी राहिला नाही जो शिवसेनेच्या अंगावर येण्याची हिंमत करेल. जो नवी मुंबईत राहिला आहे, त्यालाही तुम्ही गाडा, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी गणेश नाईकांचा नामोल्लेख टाळत केले.