औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून शिवसेना ६१ तर भाजप ५२ जागा लढविणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. तर युती करण्याचे आम्ही ठरविले असून जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय सुकाणू समितीच्या बैठकीत घेतला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीत युती असावी, अशी इच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्यावर भाजपनेही त्यांना अनुकूल भूमिका घेतली होती. पण जागावाटप अजून पूर्ण झाले नसले तरी ते जवळपास ठरले आहे व केवळ दोन जागांवर रस्सीखेच सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र दोन्ही पक्षांनी युती करण्याचे ठरविले असल्याने जागावाटपात कोणतीही अडचण येणार नसल्याचे दानवे यांनीही स्पष्ट केले. भाजपच्या सुकाणू समितीची बैठक मंगळवारी रात्री होईल. त्यात यासंदर्भात चर्चा होईल, असे सांगण्यात आले.
* ज्या वॉर्डात ज्या पक्षाची ताकद, त्याच्यासाठी ‘अ’ श्रेणी अशी वर्गवारी करीत नव्याने बोलणी सुरू झाली. जे दोन वॉर्ड वादग्रस्त आहेत, त्यांच्याऐवजी अन्य वॉर्ड सोडण्यावरून युतीचे घोडे अडले आहे.
* गुलमंडीचा वॉर्ड शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला, तर राजा बाजार भाजपला देण्याचे जवळपास नक्की झाले आहे. सहा वॉर्डात अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
* भाजपने मंगळवारी दिवसभरात ६० वॉर्डासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.