मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यावर एलईडी दिवे बसविणाऱ्या भाजपला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये या मुद्दय़ावरून तट पडले आहेत.
क्वीन्स नेकलेसचे सौंदर्य कमी करणारे एलईडी दिवे काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर सभागृहात या प्रश्नाची तड लावावी, असा मुद्दा शिवसेनेतील काही नगरसेवकांनी पालिकेतील स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. पण भाजपच्या धास्तीमुळे जुन्या पदाधिकाऱ्यांनी त्यास विरोध करून स्वपक्षाच्या नगरसेवकांना रोखले. पालिका सभागृहाच्या सोमवारच्या बैठकीत एलईडी विषय उपस्थित करून भाजपचा समाचार घ्यावा, असा आग्रह काही नगरसेवकांनी धरला होता. आता भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात शिवसेनेपुढील अडचणी वाढू शकतील, अशी भीती व्यक्त करीत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वपक्षातील नगरसेवकांना सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यापासून रोखले. दरम्यान, मरिन ड्राइव्ह येथे बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांचा खर्च  ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.