महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मानसिक अवस्था या घडीस सगळ्यांनीच समजून घेतली पाहिजे. अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसे काहीसे राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचे झाले असल्याची जळजळीत टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. जेव्हा राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आले होते तेव्हा उद्धव यांचा सरकारात सहभाग नव्हता, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी ‘सामना’मधून उध्दव यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.
पृथ्वीराज चव्हाणांचे हे विधान म्हणजे, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ याप्रमाणे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे सोबत स्वत: पृथ्वीराज चव्हाण सातारा-कराड परिसरात सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. मात्र असा अतिसुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्याने त्यांचे मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनले असल्याचीही टीका चव्हाणांवर करण्यात आली आहे. राजीव गांधी विमानाच्या कॉकपिटातून थेट पंतप्रधानपदी आले तेव्हा त्यांच्याकडे पंतप्रधानपदाच्या अनुभवाचे कोणते सर्टिफिकेट होते? असा खोचक सवालही ‘सामना’मधून विचारण्यात आला आहे.
तसेच मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर बोलत असताना, आम्हाला खुर्चीची हाव नाही, पण कोणत्याही जबाबदारीपासून पळण्याचा आमचा स्वभाव नाही. राज्याच्या जनतेने ठरवलेच तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही घ्यायला तयार असल्याचे मत उध्दव यांनी मांडले आहे.