राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ३६ हेक्टर जागा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देण्यासाठी कोणते निकष लावले गेले, याची माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार आणि पक्षप्रवक्त्या नीलम गो-हे यांनी केली.
राज्य सरकारने याच आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ३६ हेक्टर जागा नाममात्र एक रुपया भाडेपट्ट्याने ३० वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावामुळेच मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. याबाबत नीलम गो-हे म्हणाल्या, या स्वरुपाचे निर्णय घेताना त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. जर ती जागा सरकारी संस्थेला दिली असती, तर आम्ही समजू शकलो असतो. पण ती सरकारी संस्था नाही. या संस्थेने शेतकऱयांच्या फायद्याचे काय काम केले आहे, हे आम्हाला समजलेच पाहिजे, असेही गो-हे म्हणाल्या.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळावर ११ सदस्य असून, शरद पवार याचे अध्यक्ष आहेत. साखर क्षेत्राशी संबंधित शास्त्रीय संशोधन या संस्थेमध्ये केले जाते. १९७५ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.