शिवसेना सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असून ज्या शिवसैनिकांमुळे हा प्रवास पूर्ण झाला, त्यांचे आभार मानणे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी माझे कर्तव्य मानतो. शिवसेनेने नेहमीच दिलेली वचने पाळली आहेत. थापाडेगिरी शिवसेनेत चालत नाही. त्यामुळे हा पक्ष सुवर्णमहोत्सवी पक्ष ठरला आहे. ठाणेकरांना निवडणुकीपूर्वी दिलेले प्रत्येक वचन शिवसेनेने पाळले असल्याचे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात व्यक्त केले. सतीश प्रधान यांच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

ठाणे शहरातील शिवसेना नेते, माजी नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि माजी खासदार अशी विविध पदे भूषविलेल्या सतीश प्रधान यांचा ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यास उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे उपस्थित होते. या वेळी सतीश प्रधानांची ग्रंथतुला करण्यात आली. तसेच त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सतीश प्रधान पहिल्या पिढीतील नेते आहेत. या मंडळींनी लावलेले शिवसेनेचे रोपटे आता मोठे झाले आहे असे सांगितले.

उत्सव त्रास देणारे नसतात..

गणेशोत्सव हा पूर्वीच्याच दणक्यात साजरा होणार असून राज्य शासनाने त्यांची भूमिका न्यायालयात मांडली आहे. त्यामुळे हा विषय संपला आहे. उत्सव कधीच दुसऱ्याला त्रास देऊन साजरे करणारे नसतात. बाकीच्या उत्सवांवर बंदी येत असली तरी रक्षाबंधनावर आत्तापर्यंत कोणतेच र्निबध नाही त्यामुळे तो मनसोक्त साजरा करा, अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारांशी बोलताना मारली.