काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी बुधवारी पक्षाच्या सरचिटणीसपदासह अन्य पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. कामत यांनी या राजीनाम्यामागचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.  गेल्या काही काळापासून गुरुदास कामत सातत्याने पक्षनेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी गुरूदास कामत आणि संजय निरूपम यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. यावेळी कामत यांनी जाहीरपणे मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरूपम यांना टीकेचे लक्ष्य केले होते. संजय निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून अलिप्त राहिले होते.

या पार्श्वभूमीवर कामत यांची आज गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. कामत यांच्या जागी आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कामत यांनी पक्षाच्या सर्व पदांची राजीनामा दिल्याची शक्यता आहे. येत्या डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. हा नरेंद्र मोदी यांचा होमपीच असल्याने या निवडणुका भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून भाजपला याठिकाणी धक्का देण्यासाठी आतापासूनच रणनीती आखली जात आहे. त्यासाठीच काँग्रेसकडून प्रभारीपदाच्या जबाबदारीचा खांदेपालट करण्यात आला आहे. गुजरात काँग्रेसचे नवे प्रभारी अशोक गेहलोत यांच्या मदतीला एक टीमही देण्यात आली आहे. यामध्ये हिंगोलीच खासदार राजीव सातव, धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड, बुलढाण्याचे आमदार हर्षवर्धन सकपाळ आणि मध्य प्रदेशातील आमदार जितू पटवारी यांचा समावेश आहे.