वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्या मृत्यूने सारे मुंबई पोलीस हादरले आहेत. मनमिळावू, अभ्यासू आणि धार्मिक वृत्तीचा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली आहे.
 विलास जोशी हे मूळ कोकणातील खेड जिल्ह्यातील. त्याचे पदवीचे शिक्षण दापोलीत झाले. १९८६साली एमपीएससी उत्तीर्ण होऊन ते मुंबई पोलीस दलात रूजू झाले. आपल्या २८ वर्षांच्या पोलीस कारकिर्दीत त्यांनी बराच काळ मुंबईत काढला. १९८७ साली ते मुंबईच्या व्हिपी रोड पोलीस ठाण्यात रु जू झाले. या ठिकाणी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली. त्यांना दोन भाऊ असून एक वाहतूक खात्यात तर दुसरे लाचलुतपत प्रतिबंधात्मक खात्यात आहेत. त्यांना दोन जुळ्या मुली असून त्या मरीन लाईन्सच्या सेंट कोलंबो शाळेत दहावीला आहेत.
  त्यांच्याबाबत आठवण सांगतांना त्यांचे बॅचमेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरूड यांनी सांगितले की, जोशी धार्मिक वृत्तीचे होते. व्हीपी रोडला असताना ते गिरगावच्या फडके वाडी गणेश मंदिरात आणि गायवाडीच्या स्वामी समर्थ मठात नियमित जायचे. आधी तेथे दर्शन करून ते पोलीस ठाण्यात जायचे. देवदर्शनाचा हा क्रम आताही सुरू होता. पुण्याला असताना ते नेहमी माझ्याकडे यायचे ते सारसबाग आणि दगडूशेठ हलवाईच्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी. त्यांनी मुंबई ते पंढरपूर अशी पदयात्राही केली होती.तर अनेकदा खोपोली मुंबई पदयात्रा केली होती. त्यांना व्यसन नव्हते. त्यांची प्रकृतीही उत्तम होती. कुटुंबवत्सल अशी त्यांची प्रतिमा होती. मुलींचे दहावीचे वर्ष होते. त्यांना वेळ देता यावा म्हणून त्यांनी महिन्याभरापूर्वी बदलीसाठी अर्जही केला होता. घरी आल्यावर ते वडिलांची सेवा करत असत.  अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल जोशी यांनी केली होती.