अजातशत्रू असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांची सहायक उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याच्या खळबळजनक घटनेमुळे पुन्हा एकदा दिवसेंदिवस हरवत चाललेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संवादाकडे बोट दाखविले जात आहे. उपायुक्तांच्या पातळीवरील ‘ऑर्डर्ली रूम’ म्हणजेच ‘ओआर’  सुरू करण्याची गरज असल्याचे मत मुंबईत यापूर्वी काम केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई पोलीस दलात हजेरी पटाची एक पद्धत आहे. हा हजेरी पट वरिष्ठ निरीक्षक स्वत: घ्यायचे. त्यामुळे आपल्या पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांशी त्याची तोंडओळख व्हायची. आताही काही वरिष्ठ निरीक्षक ही पद्धत पाळतात. परंतु काही वरिष्ठ निरीक्षक ही जबाबदारी पोलीस निरीक्षक वा सहायक निरीक्षक वा कधी कधी उपनिरीक्षकावर सोपवितात. बऱ्याच वेळा डय़ुटीचे वाटप वरिष्ठ निरीक्षकाचा ऑर्डली करीत असतो. परंतु हा ऑर्डर्ली बऱ्याच वेळा पैसे घेऊन डय़ुटी देतो, अशा तक्रारी केल्यानंतरही वरिष्ठ निरीक्षक कानाडोळा करीत असल्यामुळे विसंवादाची पहिली ठिणगी पडते. याबाबत तक्रारी करण्यासाठी उपायुक्तांचे व्यासपीठही उपलब्ध होत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून कधी कधी टोकाचे प्रकार घडू शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांना अचानक जाहीर झालेल्या रजाबंदीचाही फटका सहन करावा लागतो. वास्तविक पोलिसांना ठरावीक मुदतीसाठी रजा दिलीच पाहिजे. मात्र त्या पोलिसानेही दिलेल्या मुदतीत रजा उपभोगून पुन्हा सेवेत हजर झाले पाहिजे. परंतु बऱ्याचवेळा किरकोळ रजेला जोडून वैद्यकीय रजा घेण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे इतर पोलिसांच्या रजा मंजूर होत नाही. यामध्ये एकप्रकारे शिस्त आणली पाहिजे, असेही हा अधिकारी म्हणाला. उपायुक्तांची पोलीस ठाण्याला भेट हा सध्या निव्वळ सोपस्कार राहिला आहे. उपायुक्ताने सर्वाधिक वेळ अशा भेटीच्या वेळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी बोलणे तसेच पोलीस ठाण्याची तपासणी करण्यावर घालविला पाहिजे. परंतु अलीकडे उपायुक्तांची भेट म्हणजे काही तासांपुरती असते. त्यात क्वचितच उपायुक्त कर्मचाऱ्यांना उपलब्ध असतात.
उपायुक्ताकडे ‘ओआर’ मागण्यासाठी अधिकारी ते शिपायाला वरिष्ठ निरीक्षक व्हाया सहायक आयुक्त असा प्रवास करावा लागतो. बऱ्याच वेळा वरिष्ठ निरीक्षकाच्या डय़ुटी ऑर्डर्लीपर्यंतच हा अर्ज पडून राहतो. त्यामुळे उपायुक्तांकडे संबंधिताला ‘ओआर’ मिळत नाही. वरिष्ठ निरीक्षकाचा डय़ुटी ऑर्डर्लीवर वचक नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य वाढते आहे. डय़ुटी ऑर्डर्लीची चक्राकार पद्धतीने नियुक्ती करण्याची सक्ती हवी, असेही  मतही व्यक्त केले जात आहे.

वरिष्ठ निरीक्षकांच्या पोलीस ठाण्याच्या पातळीवर ‘संवाद’ हरवला आहे, ही बाब खरी आहे. प्रत्येक उपायुक्ताने दररोज पोलीस ठाण्याला भेट दिली पाहिजे तसेच अतिरिक्त आयुक्तांनीही केबिनमध्ये बसून न राहता अधूनमधून अचानक भेटी देण्यावर भर दिला जाणार आहे.
– देवेन भारती, सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था