आमचे सरकार आल्यावर राज्यात गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी झाल्याचे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खून, खुनाचे प्रयत्न, दरोडे, घरफोडय़ा अशा गंभीर गुन्हय़ांची आधीच्या सरकारच्या काळातील आणि सध्याची आकडेवारी सादर केली. आरोपींना न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले असून ते ५० टक्क्य़ांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मालवणी विषारी दारू दुर्घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यात कायदा व सुव्यवस्था आलबेल असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून नागपूर कारागृहातून आरोपी पळून गेले, यासह गंभीर गुन्ह्य़ांच्या घटनांबद्दल विरोधी पक्षांनी विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. कायदा व सुव्यवस्थेचे मोजमाप करताना गुन्ह्य़ांची आकडेवारी हा निकष योग्य नाही, असे आपले मत आहे; पण विरोधी पक्षांनी आरोप केल्याने आपण आकडेवारी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील गंभीर गुन्ह्य़ांची जून २०१४ व २०१५ ची तुलना सांगताना खून १९७ ने कमी, दरोडे ११३ ने कमी घरफोडय़ा ३६५ ने कमी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याचा दावा केला. मी नागपूरचा असल्याने तेथील गुन्हेगारी वाढल्याचा आरोप केला जातो, पण तो फोल ठरविताना याकूब मेमनची फाशी नागपुरातील तुरुंगात झाली व तेथे काहीही गडबड झाली नाही. याचा उल्लेख करून आधीच्या सरकारच्या तुलनेत १२ खून कमी, ३ दरोडे कमी असल्याची आकडेवारी विधानसभेत सांगितली. न्यायालयात गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे सांगून आधीच्या सरकारच्या काळातील ८-९ टक्क्य़ांवरून हे प्रमाण ३२ टक्क्य़ांवर गेले आहे व ते ५० टक्के करण्याचे उद्दिष्ट ठरविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पानसरेंच्या मारेकऱ्यांना लवकरच अटक
भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचण्याइतपत तपासात प्रगती झाली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षांच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारच्या काळात गेल्या सात-आठ महिन्यांत, खून, बलात्कार, दरोडे, अशा प्रकारचे गुन्हे वाढले आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, असा आरोप विरोधी सदस्यांनी केली. गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही, त्याबद्दल विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक काम करीत आहे. हे पथक पानसरे यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहचेल आणि लवकरच आरोपींना अटक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.