एसटी कर्मचाऱ्यांची मागणी; आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कामगार येत्या १५ मेनंतर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. सांगलीत झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनात राज्यभरातील एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी ही भूमिका घेण्यात आली असून सातव्या वेतन आयोगावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. लग्नसराई संपताच आंदोलनाबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना देण्यात येणार असून त्यानंतर आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा मान्यताप्राप्त युनियनकडून देण्यात आला आहे.

यापूर्वीचे वेतन करार करताना त्या त्या वेळच्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसारच वेतन करार केलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या पदनिहाय वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. रविवारी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनात कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलनाची तयारी केली आहे.

वेतनवाढीवरून चर्चेचे गुऱ्हाळ

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून मागील वर्षभरापासून चच्रेचे गुऱ्हाळ सुरू आहे. अनेक बैठकांमध्ये याबाबत तोडगा निघालेला नाही. एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनेकडून  सातवा वेतन आयोग आणि २५ टक्के हंगामी वाढ या मागण्या वारंवार करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन याकरिता अनुकूल नाही. त्यामुळे मान्यताप्राप्त युनियनकडून आता आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीवर ठाम आहोत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन हे आयोगाप्रमाणे असावे.   – हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना