राजकीय वरदहस्तामुळे पालिका हतबल

राजकीय वरदहस्त लाभलेल्या मुंबईच्या उपनगरातील तबेल्यांतून आजही नाल्यात शेणपाण्यासोबत इतरही कचरा टाकला जात आहे. त्यामुळे वांद्रे, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवलीचा पोईसर येथील नाले आणि दहिसर नदी स्वच्छ केल्यानंतरही त्यात सातत्याने शेणाचे थर साचत असून यंदाही हे नाले-नदी पावसाळ्यात तुंबण्याची शक्यता आहे. शेणपाण्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता राखणे याबाबत महापालिकेने मुंबईमधील तबेल्यांच्या मालकांवर नोटिसा बजावल्या. मात्र राजकीय छत्रछायेमुळे तबेल्याच्या मालकांवर केवळ नोटिसा बजावून पालिकेला गप्प बसावे लागले आहे.

मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. त्यात उपनगरांतील अनेक तबेल्यांमधील म्हशी बळी पडल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील सर्व तबेले वसईजवळ हलविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र राजकीय वरदहस्तामुळे आजही हे तबेले मुंबईत डेरेदाखल आहेत. वाढत्या लोकसंख्येची दुधाची गरज भागविण्यासाठी या तबेल्यांना रहिवाशांकडूनही फारसा विरोध होताना दिसत नाही. मात्र पावसाळा जवळ आल्यानंतर हे तबेले नाल्यांच्या मुळावरच उठल्याची जाणीव पालिकेसह अनेकांना होते. या तबेल्यांमध्ये म्हशींची साफसफाई केली जाते. संपूर्ण गोठा पाण्याने लख्ख केला जातो. म्हशी आणि गोठय़ाची स्वच्छता केल्यानंतर पाणी थेट लगतच्या नाल्यात सोडले जाते. गोठय़ाची साफसफाई केल्यानंतर चक्क शेणपाणी नाल्यात पडते. कडक उन्हामध्ये शेणपाण्यातीत पाण्याचे बाष्प होते आणि शेणाचे जाड थर नाल्यात साचतात. त्यामुळे नदीची घुसमट होत आहे.

दहिसर नदीत शेण-मलमूत्र

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडणाऱ्या दहिसर नदीला राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पलीकडे येताच प्रदूषणाचा सामना करावा लागतो. महामार्गावरच एका बाजूने अनेक वर्षांपासून म्हशींचे तबेले असून या तबेल्यांतील शेणपाणी एका सोसायटीच्या खालून थेट दहिसर नदीत सोडण्यात येत आहे. दहिसर नदीचा हा भाग पालिकेने गाळ आणि कचरा उपसून स्वच्छ केला आहे. मात्र त्यानंतरही सातत्याने तबेल्यांतील शेणपाणी नदीत वाहात येत असून आता शेणाचे थर साचायला सुरुवात झाली आहे. वांद्रे (प.) येथे रेल्वेच्या हद्दीलगत मोठे तबेले असून तेथील म्हशींचे मलमूत्र रेल्वेच्या हद्दीतील नाल्यात सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर विलेपार्ले येथील मीलन सबवे जलमय करणाऱ्या नाल्यातही जवळच्या गोठय़ातून शेणपाणी सोडले जात आहे. त्यामुळे या नाल्याला गोबरनाला असे नाव पडले आहे.

पालिका अधिकारी हतबल

मुंबईत तब्बल १७०० गोठे-तबेले असून त्यातून लगतची गटारे, नाले, नद्यांमध्ये गाई-म्हशींचे मलमूत्र आणि अन्य कचरा टाकण्यात येत आहे. राजकीय वरदहस्तामुळे पालिका अधिकारीही गोठे-तबेल्यांवर कारवाई करण्यात हतबल झाले आहेत. मात्र नालेसफाईची पाहणी करीत फिरणारे सर्वच पक्षांचे राजकीय नेते गोठे-तबेल्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.