दरवर्षी पावसात मुंबईला गाळात घालणाऱ्या नाल्यांमधील अस्वच्छतेबाबत गळा काढणाऱ्या राजकीय पक्षांनी या वर्षीही नालेसफाईच्या पाहणीचा टिळा गुरुवारी कपाळी लावून घेतला. उद्धव ठाकरे यांनी अंधेरी परिसरातील नाल्यांची, काँग्रेसने ब्रिटानिया उदंचन केंद्राची तर राष्ट्रवादीने पूर्व व पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. दरम्यान, नालेसफाईतील भ्रष्टाचारप्रकरणी शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भाजपबाबत बोलताना उद्धव यांनी सावध पवित्रा घेतला.  ‘गेली २० वर्षे आमच्यासोबत असलेले भाजप आम्हाला दोषी धरत आहे, असे वाटत नाही’ असे सांगत त्यांनी याबाबत जास्त बोलण्याचे टाळले.

गेल्या वर्षीच्या नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नालेसफाईच्या पाहणीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र अंधेरी येथील इर्ला नाला, मोगरा नाला, फेअरडील नाला आणि ओशिवरा नदीच्या मुखाच्या भागाची उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पाहणी केली. मात्र यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली नाही. ‘२० वर्षांपासून सोबत आहे. त्यांनी सेनेवर आरोप केल्याचे वाटत नाही, असे ते म्हणाले. नालेसफाईच्या कामाबाबत प्रशासन दक्ष आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मात्र नालेसफाईची केवळ टक्केवारी उपयोगाची नाही तर प्रत्यक्षात पाऊस पडल्यावरच काम किती चांगले झाले आहे ते ठरवता येईल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसचे नगरसेवक व विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांनी गुरुवारी सकाळी ब्रिटानिया येथील उदंचन केंद्राची पाहणी केली. १५ जून रोजी सुरू होण्याची अपेक्षा असलेल्या या केंद्रातून हिंदमाता, परेल भागातील पाणी समुद्रात टाकले जाणार आहे. मात्र या भागातील नाल्यांची, गटारांची  सफाईच झाली नसल्याने तसेच पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या अरुंद असल्याने उदंचन केंद्राचा फायदा होण्याची शक्यता नाही असा आरोप त्यांनी केला. यावेळीही हिंदमाता, भायखळा परिसरातील लोकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागेल, असे छेडा म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासोबत शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली.