काळबादेवी येथील ‘गोकुळ हाऊस’ला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत बचावकार्य करताना वीरमरण आलेले तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर गोपाल अमीन, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय वामन राणे, केंद्र अधिकारी महेंद्र मधुसूदन देसाई यांना राज्य सरकारने शहिदांचा दर्जा दिला आहे. या शासन निर्णयामुळे नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करताना मृत वा जखमी झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ या शहिदांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे.

काळबादेवी येथील चिंचोळ्या हनुमान गल्लीमधील ‘गोकुळ हाऊस’ला भीषण आग लागली होती. आगीच्या विळख्यात अडकलेल्या ‘गोकुळ हाऊस’ची पाहणी करताना अचानक इमारत कोसळली आणि जळत्या ढिगाऱ्याखाली सुनील नेसरीकर, सुधीर अमीन, संजय राणे आणि महेंद्र देसाई अडकले.

मोठय़ा प्रयत्नांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. यांपैकी दोघांना डॉक्टरांनी मृत जाहीर केले. तर दोघांचा उपचारादरम्यान काही दिवसांनी मृत्यू झाला. या चौघांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी नगरसेवक आणि अग्निशमन दलाकडून करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने २२ जुलै २०१६ रोजी शासन निर्णय जारी करीत या चौघांनाही शहीद म्हणून दर्जा दिल्याचे जाहीर केले.

या शहिदांच्या कुटुंबीयांना पसंतीच्या ठिकाणी विनामूल्य एक सदनिका देण्यात येणार आहे. सदनिका उपलब्ध नसल्यास अनुज्ञेय क्षेत्रफळानुसार प्रति चौरसफूट ३००० रुपये दराने रोख रक्कम देण्यात येणार आहे. शैक्षणिक आर्हता व पात्रतेनुसार कुटुंबीयांपैकी एका व्यक्तीची पालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार

आहे. कायदेशीर वारसदारांच्या संयुक्त नावाने २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मुदत ठेव स्वरूपात देण्यात येणार असून हा निधी १० वर्षांपर्यंत काढता येणार नाही. मात्र त्याच्या व्याजाची रक्कम दर महिन्याला कुटुंबाला उपलब्ध करण्यात येणार आहे. हे शहीद अधिकारी मृत झालेले नाहीत असे मानून सेवेत असताना त्यांना मिळणारे वेतन भविष्यात त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. तसेच सेवेत असताना मिळणाऱ्या पदोन्नती आणि वेतनवाढ त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहेत.