बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईत पाळल्या गेलेल्या ‘बंद’बाबत ‘फेसबुक’वर केलेल्या मतप्रदर्शनामुळे अटक झालेली पालघरची शाहीन धाडा ही तरुणी पुन्हा फेसबुकवर परतली आहे. त्या घटनेनंतर शाहिनने आपले फेसबुक अकाऊंट बंद केले होते. शनिवारी दुपारी तिने फेसबुक अकाऊंट आणि फोन पुन्हा सुरू केला आहे, परंतु सध्या ती घरातच नजरकैद आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिला घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
  शाहिनने फेसबुकवरून बंदला विरोध करणारे मतप्रदर्शन केल्यावरून शिवसेनेने तिच्या नातेवाईकांच्या रुग्णालयावर हल्ला केल्याने तणाव निर्माण झाला होता. पालघर पोलिसांनी शाहीन आणि तिची मैत्रीण रेणू हिला अटक केली होती. या घटनेनंतर कुटुंबीयांसह गुजरातमधील आपल्या मूळ गावी गेलेली शाहीन पालघरला परतली असली तरी तिला घराबाहेर पडण्यास कुटुंबीयांनी मनाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणाने संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलेल्या शाहीनला अहमदाबादच्या आयआयएम या प्रख्यात संस्थेने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलावले आहे.
ती येत्या २१ डिसेंबरला तेथील विद्यार्थ्यांशी ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ या विषयावर संवाद साधणार आहे.    

‘माझे पालक माझ्या बाजूने असले, तरी ते कुठलाही धोका पत्करायला तयार नसल्याने मी या चार   भिंतींआड दडूनच आहे. त्या घटनेनंतर आता मी सावरले आहे. फेसबुक अकाऊंट पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी माझी मते व्यक्त करेन, पण थोडी काळजी घेईन. – शाहीन