शक्ती मिल परिसरातील दोन बलात्कार खटल्यातील तीन सामाईक आरोपींची शिक्षा वाढविण्याबाबत ठेवण्यात आलेल्या आरोपावर आज(गुरूवार) सरकारी तसेच बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद करण्यात आला. यात कासीम बंगाली, विजय जाधव व मोहम्मद सलीम अन्सारी हे तीनही दोषी कायद्याच्या दुरूस्त करण्यात आलेल्या कलम 376(ई) नुसार दोषी असल्याचा ऐतिहासिक निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे.
या निर्णयामुळे शक्तीमिल येथे घडलेल्या दोन्ही बलात्काराच्या घटनांमध्ये सामाईक आरोपी असलेल्या तिघांना फाशीची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर कायद्यामध्ये नव्याने दुरूस्ती करण्यात आली होती. या कलमानुसार दोषी आढळल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद यात करण्यात आली आहे.
शक्ती मिल येथे मागील वर्षी जुलै महिन्यात टेलिफोन ऑपरेटर तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यामधील तीन आरोपी महिला पत्रकारावरील सामूहिक बलात्कारातही दोषी आढळले त्यामुळे सातत्याने हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने या तीन नराधमांना फाशी होण्याची शक्यता आहे.