काहीजण गाव सोडून दुसऱ्या शहरात राहू लागले, काही जग सोडून गेले. पिढी  बदलली, गावाचंही शहर झालं, पण या बदलांत डोंबिवलीचा सांस्कृतिक चेहराही हरपला. पु. भा. भावे यांच्यानंतर ‘हे आमचेच’ असं डोंबिवलीकर ज्यांच्याबद्दल सांगत, ते शं. ना. नवरेही गेल्यामुळे तर सांस्कृतिक डोंबिवलीचा अखेरचा मोठा दुवा हरपला.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ‘पळापळी’मुळे वसलेलं, एकोणीसशे पन्नासच्या दशकाअखेरीस विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वाढत गेलेलं डोंबिवली हे गाव. स्थलांतरितांना संस्कृती नसते, असलीच तर ती कमअस्सल असते या समाजशास्त्रीय समजाला मोठाच हादरा देण्याचं काम या गावानं केलं. साठ- सत्तरच्या दशकात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पुनशरेधाला हातभार लावणारं हे गाव, स्वतची सांस्कृतिक ओळख निर्माण करू शकलं.
नवरे स्थलांतरितांपैकी नव्हेत. त्यांचा वाडाच होता मोठा, ‘स्टेशनजवळ’ नव्हे- हे रेल्वेस्थानक नव्हतं तेव्हापासून! भाऊबंदांपैकी कुणाची वखार, कुणाचा दुधाचा धंदा असा बारदाना होता. शंना मात्र ‘नोकरदार डोंबिवलीकर’ ही ओळख असणारे ! आपापल्या नोकऱ्या सांभाळून,  गावातल्या सांस्कृतिक कार्यासाठी वेळ देणारे अनेकजण शंनांचे समकालीन. कुणी सकाळची नऊएकची लोकल गाठायची असूनही आदल्या रात्री एक-दीडपर्यंत  राज्य नाटय़ स्पर्धेच्या तालमी करतंय, कुणी काव्यरसिक मंडळाच्या बैठकांत रमतंय, कुणी व्यंगचित्रकारांची संघटना बांधू पाहातंय, कुणी तेव्हाचं एकमेव सभागृह असलेल्या स. वा. जोशी हायस्कुलात गाण्याच्या मैफली घडवून आणतंय.. असे झपाटलेले लोक.
या ओळखीला आणखी निराळी लकाकी देणारे काही हिरे डोंबिवलीत राहूनच अन्य शहरांकडे मार्गस्थ झाले. यापैकी एक नाव गोविंद तळवलकरांचं. लोकलमध्ये डोंबिवली ते तेव्हाचं व्हीटी या प्रवासात अखंड वाचन करणारे गोविंदराव आम्ही पाहिले असल्याचं सांगणारे अनेक डोंबिवलीकर अजूनही काही आहेत. विजय तेंडुलकरदेखील डोंबिवलीत राहिले, पण त्यांच्याबद्दल अशा साक्षी देणारे कमी.  चित्रकार- व्यंगचित्रकार श्याम जोशी यांचं वडिलार्जित घर डोंबिवलीचंच. कादंबरीकार ज्योत्स्ना देवधर काही काळ इथल्या आणि कादंबऱ्यांच्या कप्प्यात कुठल्याही वाचनालयात तेव्हा दिसणारं दुसरं नाव- ना. ज. जाईल- तेही निवृत्तीपर्यंत डोंबिवलीकरच होते.  
संपादक झाल्यानंतर गोविंदरावांचा सत्कार डोंबिवलीत झाला, तेव्हा म्हणे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आले होते. पण त्यावेळचे अनेक डोंबिवलीकर असे की, त्यांना भेटायला एरवीही- कुठलाच समारंभ नसूनही- अन्य ठिकाणची मोठी माणसं डोंेबिवलीत अगदी पत्ता शोधत येत! मग तो ‘पगला घोडा’ या नाटकाच्या वाचनासाठी पेंडसेनगरात पोहोचलेला अमोल पालेकर असो की शंनांच्या घरी आलेले डॉ. काशीनाथ घाणेकर किंवा जयवंत दळवी. नाटय़दिग्दर्शक राम मुंगींकडे ‘मृत्युंजय’ नाटकाच्या तालमींआधी शिवाजी सावंत कितीकदा आले. ‘प्रत्येकाचा एक नातेवाईक असतोच इथं’ अशी ख्याती असलेल्या डोंबिवलीत सावंत, घाणेकर किंवा दळवी पोहोचले ते निव्वळ सांस्कृतिक आप्तभावनेतून.  
नागपूर सोडून डोंबिवली हीच कर्मभूमी मानणारे पु. भा. भावे यांनीही असंच सांस्कृतिक वैभव डोंबिवलीला दिलं होतं. सत्तरचं दशक संपताना भावे यांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा ती केवळ त्या भाषाभास्कराची नव्हे;  तर एका दशकाच्या सांस्कृतिक संचिताची अखेरची यात्रा ठरली होती..
अर्थात, हे खूप नंतर लक्षात येऊ लागलं. कवी, लेखक, नाटकवाले डोंबिवलीत होते आणि आहेतच. आता तर टीव्ही सीरियलवालेही आहेत- कुणी पटकथाकार,  कुणी सहदिग्दर्शक, कुणी कलावंत.. पण डोंबिवलीत ‘अॅक्टिव्हिटी’ करायचीय, असं कुणाला वाटत नाही. इव्हेंट भरपूर होतात आजही डोंबिवलीत, पण त्यामागे इथंच गाडून घेण्याची प्रेरणा मात्र नसते. सर्वत्रच सांस्कृतिक क्षेत्राला आर्थिक यशवादाची बाधा झालेली असताना ते शक्यही नाही.  
हे दोन्ही काळ शंनांनी पाहिले. पार्ले आणि पुणे या दोन्हींचं संचित डोंबिवलीनं अगदी थोडक्या अवधीत कमावलेलं पाहिलं, आणि ते संचित आता ‘दिवसेंदिवस’ सगळीकडूनच नाहीसं होतंय, हेही पाहिलं. तरीही शंनांनी, माणसातला अंगभूत चांगुलपणा तर कुठं पळून जात नाही, अशी सकारात्मक बाजू ‘शन्ना डे’सारख्या (‘लोकसत्ता’त दर रविवारी छापून येणाऱ्या) सदरातून मांडली होती.

सांस्कृतिक कार्याशी, प्रसंगी पदरमोड करून राहणारे खूपजण डोंबिवलीत होते. चारुदत्त मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, थिएटर अॅक्टिव्हिटीज अशा नाटय़संस्था, काव्यरसिक मंडळ, साहित्य सभा आणि नाटय़ महामंडळाच्या शाखा, अशा संस्था ‘जिवंत’ होत्या. त्यापैकी अनेकांना शंना हे आधार वाटायचे, जास्त वेळ/ जास्त वेळा उपलब्ध म्हणून जास्त जवळचेही वाटायचे. तसं जवळचं माणूस डोंबिवलीच्या पुढल्या पिढय़ांना मिळणं कठीण आहे.

‘सर्वकार्येषु..’चे कौतुक   
‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाने ते खूप प्रभावीत झाले होते. गेल्या वर्षी त्यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीस घरी बोलावून काही संस्थांना मदतीचे धनादेश देऊन एक संवेदनशील वाचक म्हणून या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला होता. सर्वत्र उपयुक्तता वाद आणि युज अँण्ड थ्रो वृत्ती बोकाळली असताना समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत संस्थांच्या कार्यास प्रसिद्धीचे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ‘लोकसत्ता’चे कौतुकही केले होते. मोबाइल आणि इंटरनेटमुळे संपर्क साधणे कमालीचे सोपे झाले असले तरी माणसांमाणसांमधील संवाद हरवत असल्याची त्यांना खंत वाटत होती.