सध्या काही संघटनांकडून हिंदू राष्ट्र संकल्पनेची कल्पना मांडण्यात येत असली तरी ही संकल्पना देशाच्या एकात्मतेला घातक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
इतिहासाचे विद्रूपीकरण आणि असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर देशातील काही नामवंत इतिहास अभ्यासकांची बैठक पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. रा. स्व. संघाच्या इशाऱ्यावरून केंद्र सरकारने इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न सुरू केल्याबद्दल उपस्थित इतिहासतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. समाजातील विचारवंतांनी व्यक्त केलेली भीती ही अत्यंत बोलकी आहे. देशाच्या एकात्मतेला धक्का लावण्याचा प्रयत्न गंभीर आहे. इतिहासाचे विद्रूपीकरण आणि असहिष्णुता या संदर्भात देशातील नामवंत व्यक्ती, इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांनी उपस्थित केलेल्या मतांची सरकारने दखल घेतली पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
दिल्ली विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. भन्साळी यांनी, देशातील एकूणच सामाजिक परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. इंडियन हिस्ट्री सोसायटीचे शेख आलम, इतिहासतज्ज्ञ राधिका शेषन यांनी इतिहासाच्या अभ्यासकांनी शांत बसता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच देशातील इतिहासतज्ज्ञांची व्यापक स्वरूपातील परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे या बैठकीचे संयोजक जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.