राहुल गांधी यांच्याबद्दल शरद पवार यांच्या मनात असलेली अढी कधीच लपून राहिलेली नाही. यातूनच राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल नेहमीच साशंकता उपस्थित करणाऱ्या पवार यांनी त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसण्याचे टाळून देशाचे नेते म्हणून राहुल यांचे नेतृत्व अमान्य असल्याचाच स्पष्ट संदेश रविवारी मुंबईतील सभेला अनुपस्थित राहून दिला.
गांधी घराण्याच्या नंदुरबारमधील परंपरेत प्रथमच खंड
इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली किंवा सोनिया गांधी यांच्याबरोबर काम केलेल्या शरद पवार हे गांधी घराण्यातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व स्वीकारणे शक्यच नाही. राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल पवार यांचा नेहमीच आक्षेप राहिला आहे. राहुल यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यावरही त्यांनी त्यांच्या खास शैलीत टीकाटिप्पणी केली होती. तसेच राहुल दौऱ्यावर जातात तेव्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांना गाडीत बरोबर घेत नाहीत यावरूनही पवार त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. कलंकित नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय रद्द करण्यास राहुल गांधी यांनी भाग पाडले असता, पवार यांनी अशा पद्धतीने सरकारच्या कारभारातील बाह्यशक्तीच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी बोलून दाखविली होती. राज्यात ‘आदर्श’ अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या राहुल गांधी यांच्या आदेशालाही राष्ट्रवादीने आक्षेपच घेतला होता. अलीकडेच ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी, राहुल गांधी यांच्या कार्यशैलीची आपल्याला माहिती नाही कारण त्यांच्याबरोबर कधी कामच केलेले नाही. यामुळे त्यांच्याबद्दल मी काय मत मांडणार, असा सूर लावला होता.   महाराष्ट्रात काँग्रेस संघटना वाढवायची असल्यास आधी राष्ट्रवादी काँग्रेसला कमकुवत करावे लागेल हे राहुल गांधी यांच्या डोक्यात पक्के आहे. यानुसारच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडय़ा केल्या. हीच बाब राष्ट्रवादीला बोचते. विदेशीचा मुद्दा उपस्थित करूनही सोनिया गांधी यांनी झाले गेले विसरून शरद पवार यांच्याशी चांगले संबंध ठेवले किंवा त्यांचा आदर केला. मात्र राहुल गांधी यांनी पवार यांच्याशी कधीच जमवून घेतले नाही. साखर उद्योगाची माहिती घेण्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी २००९च्या निवडणुकीपूर्वी पुण्यात येऊन शरद पवार यांच्याशी सल्लामसलत केली होती. पण ही साखरपेरणी फारशी काही फळाला आली नाही. पवार हे प्रचारानिमित्त महाड येथे होते. त्यांचे हेलिकॉप्टर बिघडल्यामुळे ते मुंबईत पोहोचू न शकल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सभेत जाहीर केले असले तरी राहुल गांधींच्या शेजारी बसून त्यांच्या भाषणाआधी भाषण उरकण्याची वेळ येऊ नये यासाठीच पवार यांनी सभेला हजर राहणे टाळले, असे बोलले जात होते.
गर्दी जमविण्याचे आव्हान!
न मिले सूर मेरा तुम्हारा..
पवार आणि राहुल यांचे सूर जुळत नसल्याचे अलीकडच्या काळात अनेकदा स्पष्ट झाले होते. राहुल यांच्या नेतृत्वाविषयीदेखील त्यांच्या मनातील संदेह लपलेला नाही. केंद्र सरकारमधील हस्तक्षेपावरूनही पवार यांची राहुल गांधींविषयी नाराजी असल्याचे सांगण्यात येत होते. राहुल व आपल्यात वैचारिक अंतर असल्याचे संकेत पवार यांनी अनेकदा दिले होते.