राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गुरूवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील निवासस्थानी घसरून पडल्याने पवारांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर शरद पवार यांना हेलिकॉप्टरने तात्काळ मुंबईत आणण्यात आले तेव्हा त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान करण्यात आले होते. पाच डिसेंबरला त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर पवारांना विश्रांती घेण्यासाठी आठवडाभर रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. पवारांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असले तरी, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करू नये, असे आवाहन मलिक यांनी केले.