शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत हेच योग्य उमेदवार असल्याचा पुनरुच्चार केला. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती म्हणून आपली पसंती मोहन भागवत यांनाच असल्याचे स्पष्ट केले. शरद पवारांच्याबाबतीत बोलायचे झाले तर ते नरेंद्र मोदी यांचे गुरू आहेत. त्यामुळे कोणाच्या मनात सध्या काय सुरू आहे, हे ओळखणे अवघड असल्याचे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. केंद्रात बऱ्याच काळानंतर एखाद्या पक्षाची एकहाती सत्ता आली आहे. अशावेळी देशाला खंबीर राष्ट्रपती मिळावा, असे कोणाला वाटणार नाही? त्यामुळेच आम्ही मोहन भागवत यांचे नाव सुचविल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

देशात हिंदू राष्ट्राची संकल्पना राबविण्याच्यादृष्टीने मोहन भागवत हे योग्य उमेदवार आहेत का, असा प्रश्नही यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, का नाही? भाजपमधील महत्त्वाच्या पदांवर संघातील स्वयंसेवकांची नियुक्ती होऊ शकते. राज्यपालपदाच्या नियुक्त्यांकडे पाहा. मग राष्ट्रपतीपदी संघातील व्यक्तीची निवड का होऊ शकत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख दुसऱ्या क्रमांकाचे सत्ताकेंद्र म्हणून करण्यात आला होता. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीदेखील नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, या भेटीचे कारण गुप्त ठेवण्यात आले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपशी संबंध ताणल्यामुळे शिवसेना संघाशी जवळीक साधू पाहत असल्याची चर्चा आहे.
मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सुचवले होते. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेविषयी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आज उद्धव यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी आमची पसंती मोहन भागवत हेच असल्याचे स्पष्ट केले.

 

शिवसेना आणि भाजपचे संबंध गेल्या अनेक महिन्यांपासून ताणलेले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. शिवसेनेने मागील दोन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन दिले होते.