आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळावे या उद्देशाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बारीक लक्ष घातले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातो.

शरद पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात निवडणुकांच्या तयारीसाठी नेमलेल्या निरीक्षकांशी चर्चा केली. जिल्हा पातळीवरील राजकीय परिस्थितीबरोबरच तालुका पातळीवरील आढावा त्यांनी घेतला. आता दरमहा निरीक्षकांशी स्वत: पवार चर्चा करणार आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. दर शुक्रवारी सुप्रियाताई पक्षाच्या मुख्यालयात बैठका घेतात. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी चांगली झाली पाहिजे यावर पवारांचा कटाक्ष आहे.

लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपयश आल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य येईल. भविष्याच्या दृष्टीने पक्षासाठी हे धोकादायक आहे. यामुळेच स्वत: पवार यांनी अगदी गावपातळीवरचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.