आजारपणामुळे काही काळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे ग्रामीण भागात पक्षउभारणीकरिता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले असून, ४० अंशांहूनही जास्त तापमान असतानाही त्यांनी भर उन्हात मराठवाडय़ाचा तीन दिवसांचा दौरा केला. काँग्रेस कमकुवत झाली असताना ही पोकळी भरून काढण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे. या दौऱ्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी मंगळवारी केली.
पवार यांनी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या पाच जिल्ह्य़ांमधील दुष्काळी भागांचा दौरा केला. मराठवाडय़ातील दुष्काळाबाबत बरेच दिवस चर्चा होत असली तरी रणरणत्या उन्हात या भागाचा दौरा करणारे पवार हे एकमेव नेते ठरले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पीछेहाट झाली होती. पक्षाला पुन्हा उभारी देण्याकरिता पवार यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. उसाच्या प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्रात भाजप सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती केल्यावर दुष्काळावरून मराठवाडय़ात सरकारला घेरण्याचा प्रयत्न पवार यांनी केला आहे. मुंबई आणि विदर्भात राष्ट्रवादीला यश मिळत नसल्याने पवार यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. या पट्टय़ात विधानसभेच्या १२५च्या आसपास जागा आहेत. पक्षाला उभारी देण्याकरिता पवार हे राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. भाजपबरोबर मेतकूट जमल्याची चर्चा होत असतानाच राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने विविध मुद्दय़ांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. याउलट काँग्रेसच्या गोटात सध्या तरी शांतता आहे. मराठवाडय़ातील दुष्काळाच्या झळा बसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीकरिता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सह्य़ाद्री’ अतिथीगृहात भेट घेतली.