आयडिया एक्स्चेंजमध्ये शरद यादव यांची टीका

सरकारला एखाद्या विषयावर जाब विचारला, प्रश्न विचारला की लगेचच जाब विचारणाऱ्यांना पाकिस्तान समर्थक किंवा देशविरोधी ठरवले जाते, अशी टीका करीत, मग लष्कराच्या तीन तळांवर हल्ले झाले त्यास जबाबदार कोण? असा सवाल संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात केला. तसेच, भारतीय जनता पक्षास सरकार कसे चालवायचे हेच माहिती नाही, आणि विरोधी पक्षाची भूमिका कशी बजावायची, हे काँग्रेसला माहिती नाही, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. या कार्यक्रमात इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकारांनी यादव यांना बोलते केले.

  • सरकारला एखादा प्रश्न विचारला की लगेच त्याला देशद्रोही ठरवले जाते अशी विरोधकांची तक्रार आहे?

– सरकारला प्रश्न विचारणेही कठीण आहे. कारण जाब विचारला की, लगेच शिक्काच मारला जातो. गेल्या दोन वर्षांत हे चित्र पुढे आले. त्यांनी मोक्याच्या जागी आपली माणसे नेमली अगदी माध्यमात देखील. मात्र हे फार काळ चालणार नाही हे सरकारने ध्यानात घ्यावे.

  • नोटाबंदी निर्णयानंतर आठच दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू झाले. मात्र गोंधळामुळे फारसे कामकाज झालेले नाही. याला जबाबदार कोण?

– संसदेत कामकाज झालेच नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. सदनात विविध पक्षांच्या नेत्यांनी भूमिका मांडली आहे. नोटाबंदीचा निर्णय गोपनीय ठेवणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र तुम्ही केवळ घोषणा कराल व संसदेत काहीच बोलणार नाही हे कसे चालेल?

  • विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा सरकारचा आरोप आहे..

– या आरोपात तथ्य नाही. नोटाबंदीची घोषणा अर्थमंत्री किंवा इतर मंत्र्यांनी केली असती तर आम्ही त्यांना उत्तर मागितले असते. मात्र पंतप्रधानांना नोटाबंदीचा सर्व तपशील माहीत आहे. सहा महिने त्याची तयारी सुरू होती असे तेच सांगतात. ते उद्या चर्चेला राजी झाल्यास सभागृह सुरळीत चालेल.

  • या मुद्दय़ावर विरोधकांमध्ये एकमत नाही?

– विरोधी पक्षांत एकजूट आहेच. तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली असली तरी विरोधातील इतर सोळा पक्षांची भूमिका तशी नाही. काळा पैसा रोखण्यासाठीचे हे पाऊल आहे, हे आम्हाला मान्यच आहे. मात्र या निर्णयानंतर सर्वच समाजघटकांना फटका बसला आहे. त्यामुळेच आम्ही हा मुद्दा एकजुटीने उपस्थित करत आहोत.

  • या मुद्दय़ावर नितीशकुमार व तुमच्याच विसंवाद दिसतो..

– आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. नितीशकुमार यांनी नोटाबंदीचे स्वागत केले आहे. मात्र ज्यावेळी एवढी मोठी घोषणा केली जाते त्याच्या तयारीचे काय?

  • एखाद्या भाजपेतर सरकारने हा निर्णय घेतला असता तर परिस्थिती भिन्न असती काय?

– भाजपला सरकार कसे चालवायचे हेच समजत नाही, आणि विरोधी पक्षाची भूमिका कशी बजावावी हे काँग्रेसला कळत नाही. यापूर्वी भाजप आमच्यासोबत विरोधात होते. आम्ही संघर्ष केला. ते आमच्याकडूनच शिकले. ते आता सरकारही चालवत आहेत आणि विरोधातही आहेत!

  • ममता बॅनर्जी यांचे विमान आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आल्याच्या मुद्दय़ाला विरोधकांनी पाठिंबा दिला. मात्र कोलकाता येथील टोलनाक्यांवर लष्करी जवानांची उपस्थिती म्हणजे जणू कटकारस्थान, असे त्या म्हणतात. तुमचे यावर मत काय?

– संघराज्यीय रचनेवर आघात होत असल्याचे अनेक जण सांगतात. त्यामुळे येथेही तीच भीती आहे. केंद्राने मात्र नेहमीच्या सरावाचा तो एक भाग होता, असे म्हटले आहे.

  • चित्रपटांच्या प्रदर्शनाआधी राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपले मत काय?

– देशभक्ती व राष्ट्रवाद या संकल्पनांचा विपर्यास होत आहे. त्या निर्णयाबाबत माझी काही तक्रार नाही. तक्रार आहे ती राष्ट्रवादाच्या आज केल्या जाणाऱ्या व्याख्येबाबत.

  • उत्तर प्रदेशात निवडणूकपूर्व आघाडीबाबत चर्चा आहे. सध्या त्याची काय स्थिती आहे. नोटाबंदीचा परिणाम होईल काय?

– एक वर्षांपूर्वी समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल, धर्मनिरपेक्ष जनता दल, समाजवादी जनता पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर हे ऐक्य टिकले नाही. अर्थात, राजकारणाचे रंग रोजच बदलत असतात..

  • नोटाबंदीच्या मुद्दय़ावर राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना व अकाली दल यांचे मत सुरुवातीला वेगळे होते. मात्र आता ते सरकारसोबत आहेत. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला?

– आम्ही शिवसेनेशी नेहमीच चर्चा करतो. त्यांची आणि आमची भूमिका एकच आहे. या घोषणेने जनतेला त्रास होत आहे. ते जरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असतील तरी त्यांचे व आमचे मत एकच आहे.