शेअर टॅक्सीचालकांचा कमाईसाठीचा मार्ग; ‘सीएनजी’ टाकीवर माणसे बसवून प्रवास
बेस्ट बस आणि रेल्वेनंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे साधन असलेल्या शेअर टॅक्सींतील प्रवास, भलताच असुरक्षित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील काही भागांत ८ ते १० रुपयांचा अधिकचा ‘शेअर’ मिळवण्यासाठी, एका शेअर टॅक्सीत ८ ते ९ प्रवाशांना कोंबून नेले जात आहे. अशा बेकादेशीर प्रवासाकडे आरटीओ अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या वर्षांत बेस्टची सलग दोनदा भाडेवाढ झाल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रवाशांना अनुक्रमे १० आणि १३ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांपासून साधारण चार ते सहा किलोमीटरच्या अंतरासाठी अनेक विभागांत प्रवासी आठ ते दहा रुपये मोजून शेअर टॅक्सीचा पर्याय स्वीकारत आहेत. बस थांब्यावर बसची वाट पाहत रेंगाळण्यापेक्षा झटकन मिळणारी शेअर टॅक्सी पकडून प्रवासी इच्छित स्थळ गाठत आहेत. परिणामी शेअर टॅक्सींचा ‘भाव’ वाढल्याचे लक्षात येताच अधिकच्या फायद्यासाठी चालकांकडून बेकादेशीर प्रवासी वाहतूक केली जात आहे.
मुख्यत: ग्रँट रोड पूर्व ते गुलालवाडी, पायधुनी, अलंकार सिनेमा, चर्चगेट ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेट वे ऑफ इंडिया, महालक्ष्मी रेल्वे स्थानक ते हाजी अली, वडाळा रेल्वे स्थानक ते अँटॉप हिल आणि एलफिन्स्टन रोड ते वरळी मार्गावर चालणाऱ्या शेअर टॅक्सींचा समावेश आहे. त्यातही अधिक पसे कमावण्यासाठी टॅक्सीतील आतील आसन रचनेत बदल करण्यात आले आहेत. यात गँटरोड परिसरात तर शेअर टॅक्सीमध्ये आसनांच्या जागी स्टूलवरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. टॅक्सीतील सििलडरच्या जवळ लाकडी टेबल ठेवून प्रवासी वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

नियम काय सांगतो?
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाचे वजन आणि प्रवासी संख्या ठरवूनच शेअर टॅक्सीचालकांना वाहतूक करण्यास परवानगी दिली जाते. त्यानुसार ‘इको’ टॅक्सीतून सहा, तर साध्या टॅक्सीतून ४ प्रवाशांच्या वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. तरीही नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यासह परवानाही रद्द केला जाऊ शकतो.

बेकादेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाईल. शेअर टॅक्सीचालकांकडून अशा प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक कोणत्या भागात होत असल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी.
-शाम वर्धने, राज्य परिवहन आयुक्त

काही टॅक्सीचालक राजकीय पक्षांचा पाठिंबा घेऊन बेकादेशीर वाहतूक करत आहेत. यात ग्रँट रोड पूर्व ते अलंकार सिनेमा, महालक्ष्मी रेल्वे स्थानक ते हाजी अली, वडाळा रेल्वे स्थानक ते अँटॉप हिल या भागात असे प्रकार होत आहेत. अशा लेखी तक्रारी आरटीओ कार्यालयात देण्यात आल्या आहेत. यात टॅक्सी मेन्स युनियनशी संलग्न टॅक्सीचालक असल्यास त्याला समज देण्यात येईल.
– ए. एल. क्वॉड्रोस, अध्यक्ष, मुंबई टॅक्सी मेन्स युनियन