ख्रिसमस आणि नववर्ष दिन साजरा करण्यासाठी मुंबईकरांची पसंती गोव्याला असते. यामुळेच या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व गाडय़ांची आरक्षणे आधीच फुल्ल झाल्याने आता मध्य रेल्वेने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रीमियम शताब्दी गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेतर्फे या गाडीच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०२००३ डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-करमाळी प्रीमियम शताब्दी गाडी मुंबईहून सकाळी ५.०० वाजता निघून करमाळी येथे संध्याकाळी ४.०० वाजता पोहोचेल. ही गाडी २४, २६, २८, ३१ डिसेंबर व २ आणि ४ जानेवारी या दिवशी मुंबईहून करमाळीला जाईल, तर गाडी क्रमांक ०२००४ अप करमाळी-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस प्रीमियम शताब्दी गाडी करमाळीहून सकाळी ७.०० वाजता निघून मुंबईला संध्याकाळी ५.५० वाजता पोहोचेल. ही गाडी २५, २७, २९ डिसेंबर व १, ३, आणि ५ जानेवारी रोजी रवाना होईल.
ही गाडी फक्त ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या स्थानकांवरच थांबेल. या गाडीची आरक्षणे सुरू झाली असून ती डायनॅमिक पद्धतीनुसार मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षणाच्या अंतिम टप्प्यात तिकीट दर पाहूनच तिकिटे आरक्षित करावीत.