माझ्या जीवनात अनंत अश्रू आणि दु:ख आहे. माझे जीवन एकाकी आहे, सोबत कुणीच नाही. माझी आई चेटकीण आहे. भावना आणि संतापाचा हा उद्रेक शीना बोराने वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिलेल्या नोंदवहीत व्यक्त केला आहे.
शीनाने दहावीत असताना मनातील भावनांना नोंदवहीत वाट मोकळी करून दिली. शीना हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना गुवाहाटी येथील घरातून शीनाची नोंदवही सापडली आहे. नोंदवहीत वडिलांना उद्देशून तिने काही पत्रे लिहिली आहेत. पप्पा, तुम्ही मला बारावीच्या परीक्षेपूर्वी भेटायला नक्की या, मी तुमचे सगळे ऐकते, असे तिने त्यात लिहिले आहे. या पत्रात तिने आई इंद्राणीबद्दल प्रचंड तिरस्कार व्यक्त केला आहे. ती चेटकीण आहे असे तिने वडिलांना सांगितले आहे. आईने एका वृद्ध माणसाशी (पीटर मुखर्जी) लग्न केले आहे. मला तिची घृणा वाटते, असेही शीनाने नोंदवहीत लिहून ठेवले आहे. शीनाच्या या नोंदींतून ती एकाकी होती, असे जाणवते.