शीना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जीविरोधात कायद्याचा फास आवळला जात असतानाच इंद्राणीने पती पीटर मुखर्जीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या इंद्राणी, पीटर हे दोघेही हत्येप्रकरणी तुरुंगात आहे.

इंद्राणी मुखर्जीने २००२ मध्ये प्रसारमाध्यम क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती पीटर मुखर्जीशी लग्न केले होते. १६ वर्ष लहान तरुणीशी प्रेमसंबंध असल्याने पीटर मुखर्जी चर्चेचा विषय ठरला होता. पीटर हे त्यावेळी स्टार इंडिया सीईओ होते. स्टार इंडियामधून बाहेर पडल्यावर पीटर यांना प्रतिस्पर्धी कंपनीत काम करता येणार नव्हते. त्यामुळे पीटर मुखर्जीऐवजी इंद्राणी मुखर्जीला पुढे करण्यात आले. या दाम्पत्याने आयएनएक्स या कंपनीची स्थापना करत तीन वाहिन्या सुरु केल्या. इंद्राणी आयएनएक्सची सीईओ होती.

दोन वर्षातच मुखर्जी दाम्पत्य आयएनएक्समधून बाहेर पडले. त्यानंतर काही काळ दोघेही यूरोपमध्ये होते. शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी होती. नात्यांची गुंतागुंत आणि संपत्तीचा वाद यातून इंद्राणीने २०१२ मध्ये शीनाची हत्या केली होती. याप्रकरणात इंद्राणीसह तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जीदेखील आरोपी आहे. हे तिघेही सध्या तुरुंगात आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत सीबीआयच्या विषेय़ न्यायालयाने इंद्राणीसह अन्य दोघांवर हत्या, हत्येचा कट रचणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी झाल्यावर इंद्राणीने न्यायालयाकडे घटस्फोटासाठी अर्ज करण्याची परवानगी मागितली. यावर न्यायालयाने घटस्फोटासाठी अर्ज करताना परवानगी गरजेचे नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पीटर हा इंद्राणीचा तिसरा पती आहे. शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी संजीव खन्ना हा तिचा दुसरा पती आहे. तर  त्यापूर्वी सिद्धार्थ दास नामक तरुणाशीही इंद्राणीने लग्न केल्याची चर्चा होती.