शीना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना या तिघांवर १५ नोव्हेंबरला आरोप निश्चिती होण्याची शक्यता आहे. शीना बोराच्या मृतदेहाची कुठे विल्हेवाट लावणार हे पीटर मुखर्जींना माहित होते असा खुलासाही इंद्राणी मुखर्जीच्या चालकाने केल्याने पीटर मुखर्जीच्या अडचणी वाढल्या आहेत.

शीना बोरा हत्याप्रकरणी शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरु झाली. पहिल्या सुनावणीत सीबीआयने कोर्टात काही महत्त्वपूर्ण माहिती सादर केली. सीबीआयने बंद लिफाफ्यात कागदपत्र सादर करण्यात आली. या कागदपत्रांची एक प्रत आम्हालाही द्यावी अशी मागणी बचाव पक्षाच्या वकिलांनी केली. मात्र आरोपनिश्चिती होईपर्यंत ही माहिती देणे अशक्य असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. तसेच सुनावणी चार आठवड्यांनी घ्यावी अशी मागणीही वकिलांनी कोर्टात केली होती. मात्र चार आठवडे हा खूप जास्त कालावधी असल्याचे सीबीआयने सांगितले. शेवटी याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला ठेवण्यात आली. याच दिवशी इंद्राणी, पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना यांच्यावर आरोपनिश्चिती केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इंद्राणीचा चालक श्याम रायने सीबीआय चौकशीत नवीन खुलासा केल्याचे आरोपपत्रातून समोर आले आहे. शीना बोराची हत्या करण्यापूर्वी तिच्या मृतदेहाची कुठे विल्हेवाट करता येईल यासाठी आम्ही जागेची पाहणी करत होतो. या दरम्यान इंद्राणीने पीटर मुखर्जीला फोन करुन चांगली जागा मिळाली आहे असे सांगितले होते असा महत्त्वपूर्ण खुलासा श्याम रायने केला आहे. आम्ही गाडीतून जागेची पाहणी करत होतो. या दरम्यान इंद्राणीने पीटरला कॉल केला. इंद्राणी पीटरशी इंग्रजीत बोलत होती. पण तिच्या बोलण्यात वारंवार शीना आणि मिखाईलचा उल्लेख येत होता असा दावाही श्याम रायने केला आहे. रायने दिलेल्या माहितीमुळे पीटर मुखर्जीच्या अडचणी वाढल्या आहेत.