बहुचर्चित शीना वोरा हत्या प्रकरणात तिचा भाऊ मिखाईल बोरा याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पोलीस चौकशीदरम्यान, मिखाईलने २४ एप्रिल २०१२ च्या रात्री आपल्यालाही मारण्याचा प्रयत्न झाला होता असे सांगितले. त्या रात्री शीनाला भेटण्यापूर्वी इंद्राणी आणि संजीव खन्ना हे वरळी येथे मी राहत असलेल्या हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मला बोलण्याच्या नादात अंमली पदार्थ टाकलेले शीतपेय दिले. त्यानंतर मला भोवळ आली आणि मला इंद्राणी आणि खन्ना तिथून निघून जात असल्याचे अंधुक दिसले. त्यानंतर या दोघांनी शीनाला भेटून तिचा खून केला. दरम्यान, शुद्धीत आल्यानंतर काहीतरी विचित्र घडतयं याचा अंदाज आल्यानंतर मी तिथून बाहेर पडल्याचे मिखाईलने पोलीसांना सांगितले. विशेष गोष्ट म्हणजे ड्रायव्हर शामवर रायनेही चौकशीदरम्यान पोलीसांनी याबद्दल माहिती दिली होती.
दरम्यान, शुक्रवारी खार पोलिसांनी पेणच्या जंगलातून शीनाच्या मृतदेहाची कवटी आणि दोन हाडे जप्त केली. आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून शीनाच्या मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे. दरम्यान, शीना ही इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास याची मुलगी असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. खार पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पेण येथे जाऊन शीनाच्या सांगाडय़ाचे काही अवशेष ताब्यात घेतले. त्यात कवटी आणि दोन हाडांचा समावेश आहे. ते डीएनए तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्यावरून हा मृतदेह शीनाचाच असल्याचे स्पष्ट होऊ शकणार आहे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा शीनाचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता तेव्हा पेण पोलिसांनी सांगाडय़ाचे अवशेष जे जे रुग्णालयाच्या अस्थी विभागाकडे पाठवले होते. आम्हाला २०१२ साली पेण पोलिसांकडून अशा प्रकारचे अवशेष मिळाले असल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.