सध्या अटकेत असलेले शाहीर शीतल साठे व विद्रोही कवी सचिन माळी गेल्या वर्षी सुमारे ५ महिने उत्तर गडचिरोलीतील जंगलात सशस्त्र नक्षलवाद्यांसोबत सक्रिय होते, अशी खळबळजनक माहिती गेल्या महिन्यात गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या चार नक्षलवाद्यांनी दिली आहे. त्यामुळे या दोघांना निरपराध ठरवत विधिमंडळासमोर प्रतीकात्मक आत्मसमर्पणाचा कांगावा करणाऱ्या पुरोगामी नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्यातील कबीर कला मंचच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या साठे व माळी यांच्याविरुद्ध वर्षभरापूर्वी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून फरार असलेल्या या दोघांनी नुकतेच विधिमंडळाजवळ उभ्या असलेल्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. या दोघांच्या अटकेवरून संपूर्ण महाराष्ट्रात काहूर उठले आहे. या दोघांचे सध्या अटकेत असलेल्या अँजेला सोनटक्के या नक्षलवादी महिलेसोबत संबंध होते या एकाच कारणावरून त्यांना नक्षलवादी ठरवले जात आहे, असा आरोप पुरोगामींच्या वर्तुळातून केला जात असला तरी प्रत्यक्षात हे दोघेही २०११च्या नोव्हेंबरपासून २०१२च्या एप्रिल महिन्यापर्यंत उत्तर गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत सक्रिय होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
याच भागात सक्रिय असलेल्या एका प्लॉटून कमांडरसह चार नक्षलवाद्यांनी गेल्या मार्चमध्ये गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या चौघांची चौकशी सुरू असताना त्यांना शीतल साठे व सचिन माळी यांची छायाचित्रे इतर काही छायाचित्रांमध्ये मिसळवून दाखवण्यात आली. या चौघांनी नेमके या दोघांना ओळखले असा दावा पोलिसांनी केला आहे. जंगलातील चळवळीत सक्रिय असताना शीतल साठे जानकी या नावाने वावरली. नक्षलवाद्यांचे दलम छत्तीसगडमध्ये गेल्यानंतर तिला शबनम व वंदना या दोन नावाने ओळख देण्यात आली. शीतलचा पती सचिन माळी या काळात समर या नावाने चळवळीत वावरला. हे दोघेही नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचा सचिव मिलिंद तेलतुंबडे ऊर्फ दीपक याच्यासोबत राहिले. २०१२च्या जानेवारी महिन्यात गोंदिया जिल्हय़ातील दरेकसा भागात झालेल्या नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीच्या बैठकीला सुद्धा हे दोघे हजर होते.
या सहा महिन्यांच्या काळात तीनदा या भागातील नक्षलवाद्यांची पोलिसांसोबत चकमक उडाली. तेव्हाही हे दोघे सोबत होते. जंगलातील वास्तव्याच्या काळात शीतल साठे व माळी यांनी नक्षलवादी चळवळीच्या प्रसाराची जबाबदारी असलेल्या कला पथकांना प्रशिक्षण दिले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारविरोधी सूर कसा लावायचा या संबंधीचे हे प्रशिक्षण होते. यासाठी या दोघांनी ‘जयभीम कॉम्रेड’ या नावाच्या पथनाटय़ाच्या काही सीडीजसुद्धा सोबत आणल्या होत्या. त्या अनेक बैठकांमधून चळवळीतील सदस्यांना दाखवण्यात आल्या. हे दोघेही पुणे व ठाणे भागात सक्रिय असलेल्या पश्चिम विभागीय समितीचे सदस्य आहेत, अशी ओळख मिलिंद तेलतुंबडेने प्रत्येक बैठकीच्या वेळी करून दिली होती, असा जबाब आत्मसमर्पण केलेल्या चार नक्षलवाद्यांनी दिलेला आहे. या दोघांचा चळवळीशी कोणताही संबंध नाही, केवळ विद्रोही विचार बाळगला म्हणून त्यांना अटक करण्यात आली, असा कांगावा करत राज्यातील काही राजकीय नेत्यांनी या दोघांना विधिमंडळासमोर समर्पण करायला लावले होते. मात्र, केवळ गर्भवती असल्यामुळेच जाणीवपूर्वक शीतल साठे व तिच्या पतीने समर्पणाचा पर्याय स्वीकारला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
साठे व माळी हे दोघेही नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याचा भक्कम पुरावा आमच्याजवळ असून या दोघांना लवकरच चौकशीसाठी गडचिरोलीत आणले जाणार आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. शाहिरी अथवा विद्रोही कविता करणे वेगळे आणि शस्त्रधारी नक्षलवाद्यांना सोबत करणे यात फरक आहे, असे ते म्हणाले.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Even after the implementation of the code of conduct the board remains in APMC
नवी मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ‘एपीएमसी’त फलक कायम